‘संजय राऊत बेरोजगार, उद्धव ठाकरे घरीच असतात म्हणून फावल्या वेळात मुलाखत’, नितेश राणेंची जोरदार टोलेबाजी

| Updated on: Jul 23, 2022 | 10:23 PM

मुळात उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत का? शिवसेना त्यांची राहिली आहे का? माझ्या माहितीप्रमाणे खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंकडे आहे. त्यामुळे उरल्या सुरलेल्यांचे काय ऐकायचे? असा खोचक सवाल नितेश राणे यांनी केलाय.

संजय राऊत बेरोजगार, उद्धव ठाकरे घरीच असतात म्हणून फावल्या वेळात मुलाखत, नितेश राणेंची जोरदार टोलेबाजी
नितेश राणे, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत 26 आणि 27 जुलै रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे, तशी माहिती संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विटरच्या माध्यमातूवन दिलीय. या मुलाखतीवरुन भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टोलेबाजी केलीय. मुळात उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत का? शिवसेना त्यांची राहिली आहे का? माझ्या माहितीप्रमाणे खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंकडे आहे. त्यामुळे उरल्या सुरलेल्यांचे काय ऐकायचे? असा खोचक सवाल नितेश राणे यांनी केलाय.

‘राऊत बेरोजगार आणि ठाकरे घरीच असतात’

त्याचबरोबर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्रात काय वजन आणि वलय आहे? संजय राऊत बेरोजगार आहेत आणि उद्धव ठाकरे घरीच असतात म्हणून फावल्या वेळात मुलाखत घेतली, असा टोला नितेश राणेंनी लगावलाय. शरद पवारांवर बोलताना नितेश राणे म्हणाले की, शरद पवार हे मोठेच आहेत. त्यांनी माझ्यावर बोलावे एवढी माझी राजकीय उंची नाही. मी त्यांच्या उत्तराचा आदर ठेवतो, असं नितेश राणे म्हणाले.

‘..तेव्हा शिवसैनिकांना भेटले असते तरी ही वेळी आली नसती’

आदित्य ठाकरे यांच्यावरही नितेश राणेंनी निशाणा साधला. अडीच वर्षात महाराष्ट्राचे नुकसान केले, ती गद्दारी आदित्य ठाकरे आणि त्यांच्या नाईट लाईफने केली. जेव्हा शिवसैनिकांना यांची गरज होती तेव्हा हे दिनो मोरियाबरोबर बसायचे. दिनो मोरियाला न भेटता शिवसैनिकांना भेटले असते तर ही निष्ठा यात्रा काढायची गरज नव्हती. तुमच्याकडे पदं होती तेव्हा तुम्हाला नाईट लाईफ आवडली. तुम्हाला त्यावेळी पटानी आवडली, तेव्हा शिवसैनिक आवडले नाहीत, अशा शब्दात नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय.

26 आणि 27 जुलैला उद्धव ठाकरेंची मुलाखत

संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन उद्धव ठाकरे यांच्या स्फोटक मुलाखतीबाबत माहिती दिली आहे. 26 आणि 27 जुलैला उद्धव ठाकरे यांची मुलाखत प्रसिद्ध केली जाईल, असं राऊत यांनी सांगितलं आहे.