मुंबई : खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांच्या घरी आज सकाळीच ईडीचे पथक दाखल झाले आहे. ईडीचे अधिकारी आणि सुरक्षा रक्षकही सकाळीच राऊतांच्या घरी पोहचले. सुरक्षा रक्षक राऊतांच्या घराबाहेर आहेत, कोणालाही घरात जाण्यास किंवा घराच्या बाहेर येण्यास मज्जाव करण्यात आलायं. ईडीने संजय राऊतांना चाैकशीसाठी नोटीसही बजावली होती. मात्र, दिल्लीत (Delhi) असल्याचे कारण देत राऊतांनी मुदतवाढ मागून घेतली होती. मात्र, आज सकाळी थेट ईडीचे (ED)अधिकारी राऊतांच्या घरी पोहचल्याने एकच खळबळ उडालीयं. पत्राचाळ प्रकरणी चाैकशी होणार असल्याचे सांगितले जात आहे. राऊतांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाल्याने आता राज्यातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
राऊतांवर करण्यात येणाऱ्या ईडीच्या कारवाईवर बोलताना मनिषा कांदे म्हणाल्या की, विरोधकांचं तोंड दाबण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. ईडी सरकारमुळे धाडी वाढणार आहेत. तर यासंदर्भात बोलताना शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत म्हणाले की, या प्रकरणामध्ये त्यांची ईडीकडून जमिन जप्त करण्यात आलीयं, ती फक्त 50 गुंठे सव्वा एकर पण नाही. मात्र हे असं दाखवण्यात आले की, 100 एकर जमीन जप्त करण्यात आली. हे सर्व बघुन खरोखरच भारतीय जनता पार्टीची किव येते. कुठल्यास्तराला जाऊन तुम्ही लोकांना छळताय. त्यांच्या हातात सर्व काही असल्याने हे सुरू आहे, पण महाराष्ट्र हे सर्वकाही पाहतो आहे, असं ईडीच्या कारवाईविरोधात अरविंद सावंत म्हणाले आहेत.
सकाळीच संजय राऊत यांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाल्याने राज्याचे राजकारण चांगलेच तापल्याचे दिसते आहे. परत एकदा राज्यात आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले आहे. ही कारवाई विरोधकांचं तोंड दाबण्यासाठी सुरू असल्याचे शिवसेनेच्या नेत्यांचे म्हणणे आहे. अनेक दिवसांपासून संजय राऊत यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आला होता. आज ईडीकडून राऊतांची चाैकशी होण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वीही राऊतांना ईडीकडून दोन वेळा समन्स बजावण्यात आला होता. त्यावेळी राऊत म्हणाले होते की, केंद्र सरकारच्या सांगण्यावरून आमच्यावर दबाब टाकला जातोयं.