मुंबई : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोना व्हायरस भारतात घेऊन आले (Sanjay Raut on Donald Trump), असा दावा शिवसेनेच्या ‘सामना’ मुखपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी अग्रलेखात केला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागत समारंभाच्या निमित्ताने लाखोंचा जलसा अहमदाबाद येथे झाला. या कार्यक्रमामुळेच गुजरातमध्ये कोरोना पसरला”, असं संजय राऊत यांनी ‘सामना’ अग्रलेखात म्हटलं आहे (Sanjay Raut on Donald Trump).
“अमेरिकेतून ट्रम्प यांच्याबरोबर आलेले काही ‘डेलिगेट्स’ मुंबई तसेच दिल्लीतही वावरले आणि संक्रमण झपाट्याने पसरले, ते नाकारता येणार नाही. संक्रमण वाढणे ही चिंता आहे. ही चिंता राष्ट्रव्यापी असायला हवी. महाराष्ट्रात संक्रमण वाढले म्हणून राष्ट्रपती शासन लावा सांगणारे या काळातही राजकारण करतात, हे धक्कादायक आहे”, असंदेखील अग्रलेखात म्हटलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प 24 आणि 25 फेब्रुवारी अशा दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले होते. ट्रम्प आपल्या कुटुंबियांसोबत गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावर 24 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास दाखल झाले होते.
डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठ्या जल्लोषात विमानतळावर स्वागत करण्यात आलं होतं. त्यानंतर मोठी मिरवणूक काढण्यात आली. दुपारी एक वाजेच्या सुमारास मोटेरा स्टेडिअमवर लाखो लोकांच्या उपस्थितीत ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांनी जनतेला संबोधित केलं होतं. त्यानंतर ते दिल्लीला गेले होते.
’17 राज्यांत सगळ्यात आधी राष्ट्रपती राजवट लावावी’
“राजभवनात विरोधी पक्षाचे लोक जातात आणि राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करतात. कोरोनाचे संकट हाच जर राष्ट्रपती राजवट लावण्याचा निकष ठरला तर उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेशसह किमान 17 राज्यांत सगळ्यात आधी राष्ट्रपती राजवट लावावी लागेल”, असा दावादेखील संजय राऊत यांनी केला आहे.
“केंद्राचे सरकारही कोरोना नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरले म्हणून त्यांच्यावरही कारवाई करावी लागेल. कोरोना झपाट्याने वाढला याचे कारण केंद्राकडे या लढाईसंदर्भात कोणतेही नियोजन नव्हते. उपाययोजना नव्हत्या. ‘लॉकडाऊन’ कसे अपयशी ठरले याचे सगळ्यात उत्तम विश्लेषण काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. कोणत्याही पूर्वतयारीशिवाय लॉकडाऊन केले. आता कोणताही ‘प्लॅन’ नसताना लॉकडाऊन उठवण्याची जबाबदारी राज्या-राज्यांवर सोडली. हा गोंधळ आहे. संकट वाढवणारा हा गोंधळ आहे”, अशी टीका ‘सामना’ अग्रलेखात करण्यात आली आहे.
संबंधित बातमी :
पाच वर्षे खिशात राजीनामे असताना सरकार तरले, मग आताच कसे पडेल? ‘सामना’तून फडणवीसांना सवाल