मुंबई : “पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रसचे प्रमुख प्रवक्ते नाहीत. त्यांचे वडील अजित पवार हे पक्षाचे प्रमुख नेते आहेत”, अशी भूमिका शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे नातू पार्थ पवार यांच्यावर प्रसारमाध्यमांसमोर टीका केल्यानंतर विविध चर्चांना उधाण आलं आहे. याप्रकरणावर संजय राऊत यांनी आज (13 ऑगस्ट) पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली (Sanjay Raut on Sharad Pawar criticize Parth Pawar).
“शरद पवारांनी एखादी भूमिका घेतली असेल, एखादं वक्तव्य केलं असेल तर त्यावर फार चिंता करण्याचं कारण नाही. शरद पवारांना ओळखणं कठीण आहे. तरीही जे शरद पवार यांना ओळखतात त्यांनी समजून घेतलं पाहिजे, पवारांचं कोणतंही विधान निरर्थक नसतं. त्यांचा अनुभव, त्यांची ज्येष्ठता, या देशाच्या राजकारणावरील त्यांचं स्थान पाहिल्यावर यामध्ये मीडियाने न पडलेलं बरं”, असं संजय राऊत म्हणाले.
यावेळी पार्थ पवार यांच्याबाबत संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. “पार्थ पवारांच्या भूमिकेवर मी कशाला बोलू? त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत विषय आहे. त्यांच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याने त्यावर मत व्यक्त केलं आहे. मी त्यावर मत व्यक्त करणार नाही. मी माझ्या पक्षाच्या भूमिकांवर मत व्यक्त करणार”, असं संजय राऊत म्हणाले (Sanjay Raut on Sharad Pawar criticize Parth Pawar).
“पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते आहेत. ते लोकसभेचे उमेदवार होते. ते पवार कुटुंबातील घटक आहेत. त्यांनी मत व्यक्त केलं. त्यावर त्यांच्या सर्वोच्च नेत्यांना जे सांगायचं होतं ते त्यांनी सांगितलं. मला वाटतं तेवढ्यापुरताच तो विषय संपला”, अशी भूमिका संजय राऊत यांनी व्यक्त केली.
“अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा मुंबई पोलीस योग्य प्रकारे तपास करत आहेत. मुंबई पोलिसांच्या क्षमतेवर शंभर टक्के विश्वास आहे, असं पवार म्हणाले आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीदेखील तेच सांगितलं. आम्ही सगळे तेच सांगत आहोत. मुंबई पोलिसांचा तपास सुरु असताना सीबीआयची मागणी करणे चुकीचे आहे. हे महाराष्ट्राच्या अधिकारावर आक्रमण आहे. आमचा विरोध नाही, तुम्ही तपास करा. इथे लपवण्यासारखं काही नाही. मुंबई पोलिसांनी जो तपास केला, त्या तपासाच्या पलिकडे सीबीआयसाठी काही शिल्लक असेल, असं आम्हाला वाटत नाही”, असं संजय राऊत म्हणाले.
“शरद पवार कायदेशीर चौकटीत असलेल्या गोष्टींना विरोध करत नाहीत. त्यांच्या सांगण्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. त्यांनी सीबीआयला आमंत्रण दिलेलं नाही. विरोध असण्याचं कारणच नाही. सीबीआय आणि मुंबई पोलीस वेगळा तपास काय करणार आहे? मुंबई पोलिसांचा तपास पूर्ण होऊ द्या. त्यातून तुम्हाला वाटत असेल किंवा तपासाचा कुठला भाग राहिला आहे, तेव्हा तुम्ही कोणत्याही संस्थेला तपासासाठी सुशांतचं प्रकरण द्या”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.