Sanjay Raut : हा तर बहाणा, एकनाथ शिंदेंच्या तीन अटींवर राऊतांची प्रतिक्रिया, अजूनही त्यांनी परत यावं; राऊतांचा एकाच वेळेस इशारा आणि आर्जव

| Updated on: Jun 21, 2022 | 10:18 PM

संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांना एकाच वेळी इशारा दिलाय आणि आर्जवही केलंय. 'एकनाथजी आमचे सहकारी आहेत. आम्ही त्यांची वाट पाहत आहोत. एकनाथ शिंदे त्यांच्या सगळ्या आमदारांसह परत येतील, याची मला खात्री आहे', असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

Sanjay Raut : हा तर बहाणा, एकनाथ शिंदेंच्या तीन अटींवर राऊतांची प्रतिक्रिया, अजूनही त्यांनी परत यावं; राऊतांचा एकाच वेळेस इशारा आणि आर्जव
शिंदेंना मुख्यमंत्री कराच्या सल्ल्यावर राऊतांचं स्पष्टीकरण
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचं निशाण फडकावलं आहे. त्यामुळे शिवसेना आणि पर्यायानं महाविकास आघाडीत मोठा भूकंप झालाय. एकनाथ शिंदे हे समर्थक आमदारांना घेऊन सूरतमधील लि मेरेडियन हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. एकनाथ शिंदे यांची बंडखोरी मोडून काढण्यासाठी शिवसेनेकडून (Shivsena) हर प्रकारे प्रयत्न केला जातोय. शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक यांना शिंदे यांच्या भेटीसाठी सूरतला पाठवण्यात आलं. शिंदे यांच्याशी उद्धव ठाकरे यांनीही फोनवरुन चर्चा केल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांना एकाच वेळी इशारा दिलाय आणि आर्जवही केलंय. ‘एकनाथजी आमचे सहकारी आहेत. आम्ही त्यांची वाट पाहत आहोत. एकनाथ शिंदे त्यांच्या सगळ्या आमदारांसह परत येतील, याची मला खात्री आहे’, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

संजय राऊतांचा इशारा आणि आर्जव

वर्षा निवासस्थानी शिवसेना आमदारांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक पार पडली. त्यानंतर शिवसेनेच्या सर्व आमदारांना पुन्हा एकदा हॉटेल मुक्कामी ठेवण्यात आलंय. वर्षावरील बैठकीनंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. राऊत म्हणाले की, विधानसभेत जेव्हा वेळ येईल, तेव्हा आकडे मोजा. आम्ही पूर्ण बहुमत सिद्ध करुन त्यांनी जर नियमांचं पालन केलं नाही, तर त्यांची आमदारकी रद्द होईल. एकनाथजी आमचे सहकारी आहेत. आम्ही त्यांची वाट पाहत आहोत. एकनाथ शिंदे त्यांच्या सगळ्या आमदारांसह परत येतील, याची मला खात्री आहे. भाजपात असताना एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणतं खातं होतं, मविआमध्ये त्यांच्याकडे कोणतं खातं दिलं गेलंय, त्यांची मान कोणत्या सरकारमध्ये जास्त राखला गेला, हे त्यांनी पाहावं. त्यांनी परत यावं, आम्ही त्यांचं प्रेमाने स्वागत करु’, अशा शब्दात राऊत यांनी एकनाथ शिंदेंना परतीचं आवाहन केलं आहे.

मोहित कंबोज यांचं नाव न घेता राऊतांचा आरोप

आमदारांना तिकडून परत यायचं आहे. पण त्यांना येऊ दिलं जात नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यात तत्काळ लक्ष घालावं, असं आवाहनही राऊत यांनी केलंय. जे आमदार सूरतला आहेत, त्यांच्या संरक्षणासाठी मुंबईतील काही गुंड तिथे बसल्याचं चित्र मी पाहिलं. ही वेळ आमच्या आमदारांवर यावी की भाजपच्या अशा लोकांकडून त्यांच्या संरक्षणाची वेळ यावी ज्यांच्यावर मुंबईत गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वाभिमानाला ही ठेस आहे, असंही राऊत यावेळी म्हणाले.