मुंबईः शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ (MP Anandrao Adsul) यांनी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. यामागेही ईडीचा दबाव (ED Pressure) हेच कारण असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलंय. गेल्या काही दिवसांपासून आंनददाव अडसूळांवर ईडीची कारवाई सुरु होती. काही भाजप नेत्यांनीतर या माध्यमातून त्यांना अटक होऊ शकते, अशी वक्तव्यं केली आहेत. त्यामुळे दबावापोटीच अडसूळांनी हे पाऊल उचललं, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेनेतील डॅमेज कंट्रोलसाठी आज संजय राऊत यांचा नाशिक दौरा आयोजित करण्यात आला आहे. नाशिकला जाण्यापूर्वी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांनी केलेले आरोपही खोडून काढले. राऊतांमुळे पक्ष सोडल्याचं म्हणणाऱ्या आमदारांनी बंडखोरी करण्यामागचं नेमकं कारण काय आहे, हे एकदा बसून ठरवा, असा सल्ला राऊतांनी दिलाय.
शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘राजीनाम्याचं वृत्त पाहिलं. महिनाभरापासून ईडीनं कारवाया केल्या. घरावरही धाड पडली. भाजपकडूनही अडसूळ यांच्यासंदर्भातल्या बातम्या येत होत्या. ही कारवाई चुकीची असल्याचं आनंदराव अडसूळ यांनी वारंवार म्हटलं. पण ईडीकडून कठोर कारवाई सुरु होती. भाजपचे काही नेते तर त्यांना ईडीच्या माध्यमातून अटक करण्याचं वक्तव्य करत होते. आता अडसूळांनी राजीनामा दिल्यानंतर याविषयी आम्ही उद्धव ठाकरेंशी चर्चा करू..’
शिवसेना खासदार भावना गवळी यांना नुकतंच लोकसभेतील मुख्य प्रतोद पदावरून हटवण्यात आलं आहे. उद्धव ठाकरेंनी एवढा मोठा निर्णय का घेतला, याबाबत प्रश्न विचारला जातोय. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, आताच नाही तर पुढल्या अडीच वर्षात अनेक निर्णय होतील. भावना गवळी उत्तम काम करत होत्या. मात्र त्या काही कायदेशीर पेचात सापडल्या होत्या. चीफ व्हिप म्हणून पार्लमेंटला भक्कम नेतृत्वाची गरज असते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सर्वांशी बोलूनच निर्णय घेतला आहे.
शिवसेना सोडून गेलेले आमदार बंडखोरी केल्याची वेगवेगळी कारणं देत आहेत. कुणी आदित्य ठाकरे, पक्षातील इतर नेत्यांवर आरोप करत आहेत तर कुणी संजय राऊतांमुळे पक्ष सोडल्याचं सांगत आहेत. निधी मिळाला नाही म्हणून पक्ष सोडल्याचंही अनेकांनी सांगितलं. त्यामुळे माझा या बंडोखोरांना सल्ला आहे. त्यांनी एकत्र बसून पुन्हा एकदा ठरवावं की नक्की पक्ष कशासाठी सोडलाय. पक्ष प्रमुखांनी त्यासाठी यांची एक कार्यशाळाही घ्यावी, असा सल्ला संजय राऊतांनी दिला.