मुंबई: चार लोकांच्या कोंडाळ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी बावरट केलं, असा दावा शिवसेनेचे (shivsena) बंडखोर नेते गुलाबराव पाटील यांनी केला होता. त्याला शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असतील. दोघांनी राज्यातील हितासाठी काम करायला हवं. त्या चार लोकांमुळेच तुम्हाला कालपर्यंत सत्ता मिळाली. ते चार लोकं पक्षाचं काम करत होते. आजही करत आहेत. गेली अडीच वर्ष का होईना तुम्ही सत्तेत राहिलात. तेव्हाही राहिलात. तेव्हाही हे चार लोकंच होती. आता त्यांना तुम्ही बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहात. पण उद्धव ठाकरे हे दुधखुळे नाहीयेत. ते बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत. ते स्वत:चे निर्णय स्वत: घेतात. जाणाऱ्यांना फक्त बहाना हवा असतो. ते काहीही बहाना शोधतात. ठिक आहे. तुम्ही निघून गेला. बहाणे देऊ नका. मंत्री आहात तर काम करा, अशा शब्दात संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील आणि बंडखोरांना फटकारले आहे.
संजय राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. शिंदे गटाने आदित्य ठाकरे सोडून शिवसेनेच्या सर्व आमदारांना नोटीस बजावली आहे. ठाकरे कुटुंबाला त्रास नको म्हणून त्यांनी इतर आमदारांना नोटीस बजावल्याचं राऊत यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यावर राऊत यांनी शिंदे यांना फटकारलं. आदित्य ठाकरेंना सोडून इतरांना का नोटीस दिली माहीत नाही. जे 14 आमदार आहेत ते बाळासाहेबांचे चेले आणि सैनिक आहेत. हेही लक्षात ठेवा, असा टोला राऊत यांनी लगावला.
शिंदे यांचं भाषण चांगलं झालं असेल. मी दिल्लीला होतो. प्रवासात होतो. मी आता भाषण वाचलं. मुख्यमंत्री विश्वास ठराव जिंकतात तेव्हा त्यांना भूमिका मांडावी लागते. त्यांनी राज्याच्या हितासाठी काय करणार हे सांगण्याऐवजी पक्ष का सोडला याचा खुलासा करत होते. राणेंचं भाषणही असंच होतं. तुम्ही राणेंचं भाषण ऐकलं असेल तर त्यावेळी विधानसभेत राणे असंच बोलले होते. भुजबळांचं भाषणही याच पद्धतीचं होतं. पक्ष सोडणारा नेता दुसऱ्या पक्षात जातो तेव्हा असे खुलासे करावे लागतात. माझ्यावरच कसा अन्याय झाला. मीच कसा बरोबर आहे. हे सांगावं लागतं. जनतेच्या भावनेला हात घालावा लागतो. त्या पद्धतीने त्यांचं उत्तम भाषण झालं, असा चिमटाही त्यांनी काढला.