मुंबई : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी 10 जूनला मतदान होणार आहे. मात्र, राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनी सहाव्या जागेसाठी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्यानंतर शिवसेनेकडून (Shivsena) त्यांना पक्षप्रवेशाची ऑफर देत शिवसेनेच्या तिकीटावर लढण्याचा प्रस्ताव देण्यात आला. यावरुन बरीच चर्चा झडल्यानंतर अखेर संभाजीराजे यांनी शिवसेना पुरस्कृत म्हणून उमेदवारी देण्याची मागणी केली. मात्र, शिवसेनेकडून संभाजीराजेंना डावलून कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केलीय. त्यावरुन संभाजीराजे यांच्या समर्थकांकडून शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करण्यात येतेय. तसंच शिवसेनेनं संभाजीराजेंच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोपही केला जात आहे. अशावेळी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय.
संजय राऊत म्हणाले की, ‘ पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रश्न येतोच कुठे. शिवसेनेची एक जागा आम्ही छत्रपतींना द्यायला तयार झालो यात पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न येतोच कुठे. कुणी काही बोलत असेल, जपून आणि संयमान बोलावं. शिवसेना किंवा एकंदरित महाविकास आघाडीबाबत असं बोलणं हा छत्रपतींच्या विचारांचा अपमान आहे. आम्ही स्वत: शिवसेनेची एक जागा, जी जिंकण्यासाठी 42 मतं लागतात. त्यासाठी त्यांना उभं करण्याची आमची तयारी होती. ती जागा त्यांनी स्वीकारायला हवं होतं. यापूर्वीही ते राष्ट्रवादी होते. राजकीय पक्षात काम त्यांनी केलं आहे. राजकीय पक्षांची मजबुरी काय असते हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे खंजीर खुपसण्याची भाषा शक्यतो कुणी करु नये’.
संजय राऊत यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. त्याबाबत संजय राऊत म्हणाले की, ‘पवारांची सदिच्छा भेट घेतली. आशीर्वाद घेण्यासाठी गेलो. उद्या माझ्यासह शिवसेनेचे दोन उमेदवार अर्ज भरणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेबही येणार आहेत. महाराष्ट्राचं देशाचं उत्तुंग नेतृत्व आहे, या सरकारचा आधारस्तंभ आहे. वडीलधारे आहेत, त्यांचा आशीर्वाद घेणं गरजेचं आहे. विविध विषयांवर चर्चा झाली’, असंही त्यांनी सांगितलं.
‘ते ठाम आहेत की सहावा उमेदवार जो आहे, जो शिवसेनेचा आहे तो 100 ठक्के विजयी होईल. त्याची सर्व तयारी सुरु आहे. भाजपनं घोडेबाजाराला उत्तेजन देऊ नये. या मताचे आम्ही सर्व आहोत. पण जर कुणी विधानसभेत घोड्यांचा बाजार करत असेल तर ती त्यांची इच्छा. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. पण शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, अनेक लहान पक्ष शिवसेनेसोबत आहेत’, असा दावाही संजय राऊत यांनी यावेळी केलाय.