‘फोनमध्ये उद्धव ठाकरेंचा उर भरुन आला, मलाही भरुन आलं’, संजय राऊत गहिवरले

| Updated on: Nov 10, 2022 | 12:02 AM

जेलमधून सुटल्यानंतर आपल्या घरी आल्यावर संजय राऊतांनी आजचा उद्धव ठाकरेंसोबतचा अतिशय भावनिक प्रसंग सांगितला.

फोनमध्ये उद्धव ठाकरेंचा उर भरुन आला, मलाही भरुन आलं, संजय राऊत गहिवरले
Follow us on

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज जेलमधून बाहेर पडल्यानंतर रात्री उशिरा त्यांच्या भांडूप येथील निवासस्थानी पोहोचले. त्यांच्या निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्यातील आजचा भावनिक प्रसंग सांगितला. शिवसेनेसाठी आजचा दिवस खरंच खूप मोठा होता. शिवसेना आज ज्या परिस्थितीतून जातेय ती आतापर्यंतची गेल्या तीन दशकांपासूनची सर्वात वाईट परिस्थिती आहे. पण तरीही संजय राऊतांसारख्या नेत्याने मोडेन पण वाकणार नाही, अशी भूमिका अंगिकृत करत शंभर दिवस जेलमध्ये मुक्काम केला. अर्थात हा सगळा न्यायालयीन भाग आहे. पण जेलमधून सुटल्यानंतर आपल्या घरी आल्यावर संजय राऊतांनी आजचा उद्धव ठाकरेंसोबतचा अतिशय भावनिक प्रसंग सांगितला.

“जेलमधून सुटल्यावर मला उद्धव ठाकरेंचा फोन आला. माझ्याशी बोलले. यावेळी त्यांचा उर भरुन आला. मलाही भरुन आलं”, असं संजय राऊत म्हणाले.

“शिवसेना हा परिवार आहे. रस्त्यात जिथून जिथून मी जात होतो त्या प्रत्येक ठिकाणी लोक थांबून मला अभिवादन करत नव्हते तर शिवसेनेला अभिवादन करत होते”, असं राऊतांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

“आम्ही मोहम्मद अली रोडवरुन जात होतो. मुस्लीम समाज खाली उतरुन शिवसेनेच्या नावाने जयजयकार करत होता”, असं राऊत म्हणाले.

“माझी सेक्युरिटी काढली. काढाना. मी तुम्हाला घाबरतो का?”, असा सवाल त्यांनी केला.

“माझ्या अटकेचा आदेश दिल्लीतून आले. उसको अंदर डालो तो हमारी सरकार आएँगी ! हे मला माहिती होतं”, असं संजय राऊत म्हणाले.

“ज्याने शिवसेना फोडली, तोडली, आमचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं, शिवसेनेचा नाव गोठवण्याचा प्रयत्न चालू आहे त्या सर्वांच्या छातडावर बसून शिवसेनेचं तेच तेज आणि वैभव, ताकद आकाशाला गवसणी घालणारी असेल. माझ्या अटकेने सुरुवात झालीय. आता सुटलोय. सुसाट सुटायचं आहे”, असं ते कार्यकर्त्यांना म्हणाले.

“आता खोक्यांची बदनामी करत आहेत. महाराष्ट्रातील बोके खोक्यावर बसलेली आहेत. आता फक्त ओक्के शिवसेनाच. ती सुद्धा उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंची. गद्दारांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकार नाही”, अशा शब्दांत संजय राऊत कडाडले.

“मुंबई महापालिका, मुंबई आपल्या हातातून काढण्यासाठी शिवसेना फोडलीय हे लक्षात घ्या. पण ते होणार नाही”, असं राऊत म्हणाले.

“मी आज आर्थर रोड जेलमधून सुटल्यापासून जे वातावरण पाहतोय की माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकासाठी संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रात ऊर्जा निर्माण झालीय. ही खरी शिवसेना आहे. हा खरा आपला परिवार आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

“माझी सेक्युरिटी काढली. काढाना. मी तुम्हाला घाबरतो का?”, असा सवाल त्यांनी केला.

“मला पुन्हा अटक करण्याचा प्रयत्न, शिवसेनेच्या प्रत्येक नेत्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय. किशोरी पेडणेकरांना त्रास देत आहेत. काल भास्कर जाधवांवर गुन्हा दाखल केला. सुषमा अंधारे यांच्यावर काहीतरी चालू आहे. करु द्या”, असं ते यावेळी म्हणाले.