बीड आणि परभणीच्या घटनांवरुनही खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार ताशेरे ओढले. “बीडची परिस्थिती अशी आहे की एका जिल्ह्यात राष्ट्रपती शासन लागू करावं. आपल्या घटनेत तशी तरतूद नाही. मी परिस्थिती सांगतो. तिथे सामाजिक राजकीय परिस्थिती गंभीर आहे. तिथे दंगल होईल, लोक रस्त्यावर येतील अशी परिस्थिती आहे” असं संजय राऊत म्हणाले. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन संपूर्ण बीड जिल्ह्यात संतापाची भावना आहे. लोकांच्या मनात आक्रोश आहे. संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणतेने हत्या करण्यात आली. यात वाल्मिक कराडच मुख्य नाव येत असून तो मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय गोटातील असल्याचा दावा करण्यात येतोय.
“मुख्यमंत्र्यांनी बीडला गेलं पाहिजे. ते गृहमंत्री आहेत. त्यांच्या लाडक्या धनुभाऊला घेऊन जावं. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचा आक्रोश जर या सरकारला दिसत नसेल तर हे सरकार माणुसकी शुन्य आहे. त्याबद्दल आमच्या मनात कोणतीही शंका नाही” असं संजय राऊत म्हणाले.
बीडचा आरोपी तुमच्या मंत्रिमंडळात
“बीड आणि परभणीत ज्या घटना घडल्या. त्यावर फडणवीस थातूर मातूर उत्तर देत आहेत. थातूरमातूर हा शब्द योग्य आहे. सरकारचे मंत्री बीडला जात आहे. काय काम आहे तिथे? बीडचा आरोपी तुमच्या मंत्रिमंडळात. तुमच्या खात्यात. परभणीचा आरोपी अजूनही पोलीस खात्यात. ज्याने कस्टडीत सोमनाथ सूर्यवंशीला मारलं. ते पोलीस खात्यात तुम्हाला सलाम करत आहेत. आणि मंत्री जाऊन बीडमध्ये नौटंकी करत आहात हे तुम्हाला शोभतं का?” असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला.