मुंबई: गुजराती आणि राजस्थानचे लोक मुंबईतून निघून गेल्यास मुंबईत काय उरेल? असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (bhagat singh koshyari) यांनी केलं होतं. त्यावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी आणि मनसेने या विधानावरून राज्यपालांना खडेबोल सुनावले आहेत. तर शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी राज्यपालांवर टीका करतानाच शिंदेगट आणि भाजपची कान उघाडणी केली आहे. राऊतांनी एकापाठोपाठ चार ट्विट करून संताप व्यक्त केला आहे. राज्यात भाजप (bjp) पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला आहे. थोडा जरी स्वाभिमान आणि अभिमान असेल तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा घ्या. अथवा शिवसेनेचं नाव घेऊ नका, अशा शब्दात राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे आता शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.
आता तरी..
ऊठ मराठ्या ऊठ..
शिवसेना फोडून बुळबुळीत सरकार का आणले याचा खुलासा भाजपा राज्यपालांनी केला आहे..
बुळबुळीत गटाचे लोक उठणार नाहीत..
मराठ्या तुलाच उठावे लागेल.. pic.twitter.com/QYX4weHdQ2— Sanjay Raut (@rautsanjay61) July 30, 2022
महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला. स्वाभिमान, अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका. मुख्यमंत्री शिंदे तुम्ही राज्यपालांचा साधा निषेध तरी करा. मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे, असं संजय राऊत यांनी ट्विटमधून म्हटलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी राज्यपालांचा व्हिडीओही एम्बेड केला आहे.
काय ती झाडी… काय तो डोंगर… काय नदी… आणि आता… काय हा मराठी माणूस… महाराष्ट्राचा घोर अपमान! 50 खोके वाले आता कोणत्या झाडी डोंगरात लपून बसलेत, अशी टीकाही राऊत यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये केली आहे.
थोडक्यात काय तर महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडा आहे… 105 मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाई यांनी देखील केला नव्हता… मुख्यमंत्री शिंदे, ऐकताय ना? की तुमचा महाराष्ट्र वेगळा आहे. स्वाभिमानाचा अंश उरला असेल तर आधी राज्यपालांचा राजीनामा मागा. दिल्ली पुढे किती झुकताय?, असा सवालच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.
आता तरी… ऊठ मराठ्या ऊठ… शिवसेना फोडून बुळबुळीत सरकार का आणले? याचा खुलासा भाजपा राज्यपालांनी केला आहे. बुळबुळीत गटाचे लोक उठणार नाहीत. मराठ्या तुलाच उठावे लागेल, असं आव्हानच संजय राऊत यांनी मराठी माणसाला केलं आहे.