मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पूरग्रस्त भागाची पाहणी करायला गेले आहेत. त्यांच्यासोबत निलंबित आमदार आशिष शेलारही आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. राज्यपाल नेहमी घटनेचं पुस्तक चाळूनच काम करतात. या पुरात घटनेचं पुस्तक वाहून गेलं का ते मला पाहावं लागेल, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. (sanjay raut slams governor bhagat singh koshyari’s flood affected area visit)
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दौऱ्यावर थेट हल्ला चढवला. राज्यपाल हे नेहमी घटनेचं पुस्तक चाळून काम करतात. या पुरात घटनेचं पुस्तक वाहून गेलं का मला पाहावं लागेल. घटनेनुसारच काही आमदारांचं निलंबन झालं आहे. ज्या पद्धतीने विधिमंडळात काही आमदारांनी गोंधळ घातला, हंगामा केला, दंगल केली. राजदंडाला हात घातला हे वर्तन घटनाबाह्य असल्याने विधानसभा अध्यक्षांनी त्यांचं निलंबन केलं. याचा अर्थ राज्यपाल विधानसभेचे अधिकार मानायला तयार नाहीत. विधानसभेचं अस्तित्व आणि घटनेने दिलेले अधिकार राज्यपाल मानत नसतील. त्या संदर्भात सरकार काय करते ते पाहावं लागेल, असं राऊत म्हणाले.
राज्यपालांना जास्त समजतं असं मी मानतो. आताच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले त्याप्रमाणे निलंबित आमदारांना घेऊन राज्यपाल गेले आहेत. तर ते नक्कीच जास्तीत जास्त मदत आणतील असं आम्ही मानतो, असा टोलाही त्यांनी लगावला.
महाड दुर्घटनेला केंद्र सरकार जबाबदार आहे, असं शिवसेनेने म्हटल्याचं त्यांना विचारताच राऊत भडकले. महाड दुर्घटनेला कोणीही केंद्र सरकारला जबाबदार धरलेलं नाही. हे चुकीचं विधान आहे. ही नैसर्गिक आपत्ती आहे. त्याचा केंद्राशी काय संबंध? केंद्र आणि राज्याने एकत्र येऊन या आपत्तीतून लोकांना सावरून न्यावं, अशी भूमिका आम्ही मांडलेली आहे. याचा अर्थ केंद्राला या घटनेला जबाबदार धरलं असं होत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मातोश्रीत जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते देशातील मोठे नेते आहेत. देशातील 11 कोटी जनतेचं ते आशास्थान आहे. तेही त्यांच्याकडे अपेक्षने पाहतात ही माझी भावना आहे. वाढदिवस साजरा करू नका असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करत नाही. मात्र, आमच्यासारखे काही नेते येऊन त्यांना शुभेच्छा देत आहेत, असं सांगतानाच त्यांनी देशाचं नेतृत्व करावं अशी आमची इच्छा आहे, असंही ते म्हणाले. (sanjay raut slams governor bhagat singh koshyari’s flood affected area visit)
संबंधित बातम्या:
ज्यांचा संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळा; शरद पवारांचं आवाहन
राऊत म्हणतात, उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करावं; शरद पवार म्हणाले…
Governor at Taliye | राज्यपाल कोश्यारी चिपळूण आणि दरडग्रस्त तळीयेच्या दौऱ्यावर
(sanjay raut slams governor bhagat singh koshyari’s flood affected area visit)