गेल्या काही दिवसांपासून लपून बसलेल्या जयदीप आपटे यांना अखेर अटक करण्यात आली आहे. कुटुंबीयांना भेटायला आलेले असताना जयदीप आपटेंना अटक करण्यात आली असून त्यांना सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. जयदीप आपटे हे शिल्पकार आहे. सिंधुदुर्गातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम निकृष्ट दर्जाचं केल्याने हा पुतळा पडल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांना अटक झाल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. जयदीप आपटेंच्या जामिनाच्या ठाण्यातून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जयदीप आपटेच्या अटकेबाबत भाष्य केलं आहे. जयदीप आपटेचा बॉस त्यांना वाचवू शकला नाही. आता जयदीप आपटेला अटक होण्याआधी सिंधुदुर्गाच्या कोर्टात त्यांच्या जामिनाची तयारी आठ दिवसांपासून सुरू आहे. त्यासाठी ठाण्यातून सूत्र हलत आहेत. मी वारंवार ठाण्याचा उल्लेख करतोय. दोन दिवसात आपटे सरेंडर होतील, ताबडतोब त्यांच्या जामिनाची व्यवस्था करा, अशी सूत्रे ठाण्यातून हलत आहेत. आपटेंना ठाण्यातूनच कायदेशीर मदत मिळत आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, आपटे यांचे वकील गणेश सोहनी हे त्यांच्या नातेवाईकांसह कल्याण डीसीपी कार्यालयात पोहोचले होते. मात्र जयदीपला सिंधुदुर्ग येथे नेल्याची माहिती त्यांना मिळाली आहे. मात्र, जयदीप आपटे यांनी ठरवून स्वतःहून समर्पण केले असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला आहे. पुतळा दुर्घटनेनंतर त्यांच्यावर सर्व दोष ठेवून राजकारण सुरू असल्याने त्यांनी रात्रीच्या अंधारात समर्पण केल्याचे सोहनी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आपटे यांच्या गेल्या 15 दिवसांपासून पोलीस शोध घेत होते. त्यासाठी आपटे यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, आपटेला अटक झाल्यानंतर त्याचे कुटंबीय गायब झाले आहे. आज पहाटे 4 वाजता अंधाराचा फायदा घेऊन आपटे कुटुंबाने पोबारा केला आहे. हे कुटुंब कुठे गेलं? याची पोलिसांना काहीच माहिती नाहीये. त्यामुळे पोलिसांचं काम वाढलं आहे. या कुटुंबाचा शोध घेण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला. पण त्या पुतळ्याची रचना करणारा जयदीप आपटे हा कालपर्यंत फरार होता आणि त्याला काल अटक झाली? पोलीस का शोधू शकले नाही त्याला? याच उत्तर सरकारने दिल पाहिजे, असं काँग्रेस नेते नसीम खान यांनी म्हटलं आहे.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांची चूक असेल तर अपटावेच लागेल, त्यांच्या चुका महाराष्ट्रने सहन करायचा काय? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जीव ओतून तयार केला नसेल तर कायद्याने शिक्षा केली पाहिजे. इथे कुठेही माफी नाही. शिक्षा होईल, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.