“राज ठाकरे जिथे भाषण करुन गेले, तिथे अंडरवर्ल्डच्या मदतीने निवडणूक लढवली जात आहे. मुंबईतल्या अनेक मतदारसंघात ठाण्यात, पुण्यात अनेक नामचीन गुन्हेगार ज्यांचा कधीकाळी अंडरवर्ल्ड टोळ्यात सहभाग होता, मी त्यांची नाव देऊ शकतो, अनेक असे गुंड आहेत, मी त्यांचं नाव देईन. आम्ही राजकीय पक्ष निरीक्षक, संपर्कप्रमुख नेमतो, तशा या गुंड टोळ्यांच्या मोहोरक्यांवर विधानसभेची जबाबदारी दिली आहे” असं गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. “कांजूरमार्ग, विक्रोळी, भांडूप, दादर असेल ठाणे शहर असेल या ठिकाणी ठरवून गुंड घेण्यात आले आहेत. काही लोकांचा त्यासाठी जामिन करुन घेतला आहे. अनेकांना पक्षात घेतलय. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गुंडांच्या रात्री रीतसर बैठका होतात” असा दावा संजय राऊत यांनी केला.
“या गुंडांकडून पोलीस आदेश घेतात. निवडणूक आयोगाला याची माहिती देणार आहे. या गुंडांकडून पोलीस आदेश घेतात. मविआला मदत करणारे कार्यकर्ते त्यांना तडीपार करायचं, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे, त्यांना धमक्या द्यायच्या. माझं कायदा-सुव्यवस्था संभाळणाऱ्या पोलिसांना आव्हान आहे, सरकार बदलत असतं. सरकारं जात येत असतात. पोलीस खात्याला कलंक लावला जात आहे. पोलीस खात्याची बेअब्रू होत आहे. मिस्टर सत्य नारायण चौधरी तुमच्या खाली काय जळतय हे बघा. मला जास्त बोलायला लावू नका. सरकार बदलत असतं हे लक्षात घ्या, सरकार बदलणार या ,सगळ्याचा हिशोब केला जाईल” असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
‘मिस्टर चौधरी, मला धमक्या देऊ नका’
“सत्यनारायण चौधरींनी यादी मागितली, तर मी त्यांना गुंडांची यादी द्यायला तयार आहे. कोणत्या अधिकाऱ्यांना कोणत्या गुंडांना मदत करण्यासाठी वर्षावरुन काय सूचना येत आहेत, हे सत्यनारायण चौधरीं इतकं कोणाला माहित नाही. तुम्ही कोणासाठी काम करताय? मी नाव देऊ का तुम्हाला मिस्टर चौधरी? मला धमक्या देऊ नका. मुंबई-महाराष्ट्रात काय चाललय? हे गुंडांच्या मदतीने निवडणूक लढवू इच्छित आहेत. लोकसभेला झालं आता विधानसभेला तेच करतायत” असा आरोप संजय राऊत यांनी केला.
‘…तर जे काही घडणार त्याची सगळी जबाबदारी पोलिसांवर’
“पोलीस गुंडांच्या मदतीने आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतील, तर मविआ याची गांभीर्याने नोंद घेत आहे. हे सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावं. मला धमक्यांचा बाऊ करायची सवय नाही. ईडी, सीबीआय आणि गुंडांना मी घाबरत नाही. खून, खंडणी, अपहरण असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे ज्यांच्यावर आहेत, ज्यांनी दाऊद गँग बरोबर काम केलय, अशा गुंडांना वापरुन आमच्या विरुद्ध निवडणुका लढवत असतील, तर जे काही घडणार त्याची सगळी जबाबदारी पोलिसांवर आहे” असा इशारा संजय राऊत यांनी दिला.