मुंबई: गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी ट्विट करून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं आहे. बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा नाहीच, असं एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्याला शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बाळासाहेब हे गुरू होते, तसेच त्यांच्यात गुरुर होता. त्यांच्यात ब्रह्मा, विष्णू, महेश होते. ते आमचे तेजस्वी नेते होते. त्यांनी आम्हाला सावरलं. देश आणि महाराष्ट्र त्यांना गुरुस्थानी मानतो. एकनिष्ठेने शिवसैनिक बाळासाहेबांसोबत आहेत. एकनिष्ठा हीच गुरुदक्षिणा असते. आम्ही या उपकाराखाली नेहमी राहू, असं संजय राऊत म्हणाले. राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. नगरसेविका शीतल म्हात्रे (sheetal mhatre) यांनी बंड करून शिंदे गटात प्रवेश केल्याबाबत त्यांना विचारण्यात आलं. त्यावर राऊत यांनी बोलण्यास नकार दिला आणि ते थेट पत्रकार परिषदेतून उठून गेले.
बाळासाहेबांनी आम्हाला सर्व काही दिलं. गुरु हा मोकळ्या हाताने देत असतो. बाळासाहेबांनी मोकळ्या हाताने उधळण केली. असा गुरू होणे नाही. ते महाराष्ट्राचे आणि एका अर्थाने देशाचे गुरु होते. प्रत्येक दिवशी या गुरुचं स्मरण आम्हाला होतं. आजच्या दिवशी विशेष होतं. आश्चर्य वाटतं, काही लोकांनी शिवसेनेच्या बाहेर जाऊन… बाळासाहेबांच्या शिवसेनेतून बाहेर गेले आणि म्हणतात बाळासाहेब आमचे गुरू. आज बाळासाहेब असते तर अशा लोकांना त्यांच्या स्टाईलने फटकारलं असतं, असं राऊत म्हणाले. बाळासाहेबांनी आमच्यावर उपकार केले आहेत. त्यांना कदापि विसरणे नाही, असंही ते म्हणाले.
यावेळी राऊत यांनी शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनाही फटकारलं. कुणाला उत्तर द्यायचं आता. पक्षाने उत्तर दिलं आहे. ही कायदेशीर लढाई आहे. रडीचा डाव आहे तर मग तुम्ही कोर्टात का गेला? तो रडीचा डाव नव्हता का? कोर्टाने काय निर्णय दिला हे राज्यपालांना कळवणं हे आमचं कर्तव्य आहे, असं ते म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गुरुपौर्णिमेनिमित्त ट्विट करून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं. बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच.विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही….गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन…, असं शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच.
विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही….
गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन…#गुरुपौर्णिमा pic.twitter.com/NKYUBOYQXk
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 13, 2022