मुंबई: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांचा गट मनसेत विलीन होणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे यांनी एक नाही दोन वेळा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्याशी दुरध्वनीवरून फोन केला असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मनसेला अशा पद्धतीने मुख्यमंत्रीपद मिळणार असेल तर ती ऐतिहासिक गोष्ट असेल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. ज्यांना कुठे जायचे त्यांनी जावं. तो त्यांचा प्रश्न आहे. पण ज्या शिवसेनेने जन्म दिला, त्यांचा द्वेष करून दुसऱ्या पक्षात जाणार असाल तर महाराष्ट्रातील माती आणि महाराष्ट्रातील जनता त्यांना माफ करणार नाही, असा हल्लाबोलही राऊत यांनी चढवला आहे. राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
ते एमआयएममध्येही जाऊ शकतात. ते समाजवादी पार्टीत जाऊ शकतात. कम्युनिस्ट पार्टीतही जाऊ शकतात. ते कुठेही विलीन होऊ शकतात. त्यांना आपल्या आमदारक्या वाचवायच्या असतील तर ते असल्या पक्षात जाऊ शकतात. ज्या शिवसेनेने त्यांना जन्म दिला. ज्यांनी पाळणा हलवला. त्यांचा द्वेष करून दुसऱ्या पक्षात जाणार असतील तर महाराष्ट्रातील माती त्यांना माफ करणार नाही. त्यांनी मनसेतही जावं. कोणत्याही पक्षात जावं. मनसेला मुख्यमंत्रीपद मिळणार असेल अशा पद्धतीने तर ऐतिहासिक गोष्ट घडेल, असा टोला राऊत यांनी लगावला.
महाविकास आघाडीसोबत का राहू नये? असा सवाल त्यांनी केला. भाजप मेहबुबा मुफ्तीबरोबर राहू शकते तर महाविकास आघाडी या मातीतील पक्ष आहे. ज्यांचे मेहबुबा मुफ्तीशी ज्यांचे संबंध आहेत. त्यांच्याशी कसे संबंध ठेवू शकता? ज्यांना आरडीएक्स कुणी ठेवले हे माहीत नाही त्यांच्याशी कसे संबंध ठेवू शकता? एक उदाहरण दाखवा शिवसेनेने किंवा उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाशी प्रतारणा केल्याचं. एक उदाहरण दाखवा. काश्मीरमध्ये पंडित मारले जात आहेत. पाकिस्तानची घुसखोरी झाली आहे. चीनमध्ये सैन्य घुसले हे काय हिंदुत्व आहे का? हे समजून घ्या. दरवाजे उघडा. बधीरतेत राहू नका. ही बधिरता कशामुळे आली हे आम्हाला माहीत आहे, असं सांगतानाच त्यांनी महाराष्ट्रात मुंबईत यावं. मोकळ्या हवेत श्वास घ्यावा. भाजपच्या लोकांचा घेराव पडलाय. तो दूर करावा. काल म्हणे अमित शहांनी बंडखोरांशी चर्चा केली आहे. त्यामुळे त्यांच्यात चैतन्य निर्माण झालं आहे, असंही ते म्हणाले.
ते हिंमतीचे लोकं आहेत. म्हणून सुरतला गेले. गुवाहाटीला गेले. केंद्राकडून सुरक्षा मिळतेय. भीती कसली आहे? महाराष्ट्रातील रोषाला कोणी रोखू शकत नाही. तुम्हाला भाजपचे गुलाम राहावं लागणार नाही. इथेही डोंगल पाणी हवा कोंबडी, बकरे सर्व आहेत. प्रत्येकाचा आत्मा मेला असेल तर त्यांच्याकडून निष्ठेच्या अपेक्षा काय करायच्या? ज्या लोकांना डांबून ठेवलं ते परत येतील असं आम्हाला वाटतं. ते आमचे लोकं आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी, उद्धव ठाकरेंनी त्यांना ममतेने सांभाळलं आहे. अडीच वर्षाची परिस्थिती पाहिली. त्याचा गैरफायदा घेऊन गेला असेल तर अमानुष आहे. ईडी आणि सीबीआय मतं देणार नाही. मतं जनता देते हे लक्षात ठेवा, असंही ते म्हणाले.