मुंबई: पत्राचाळ प्रकरणी अटकेत असलेल्या प्रवीण राऊतांकडून शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना दर महिन्याला लाख रुपये मिळत असल्याचा दावा ईडीने (ED) केला आहे. प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांच्या आर्थिक व्यवहार होत होता, असा दावाही करण्यात आला आहे. मात्र, हे आरोप संजय राऊत यांचे भाऊ आणि शिवसेनेचे आमदार सुनील राऊत (sunil raut) यांनी फेटाळून लावला आहे. आडनाव राऊत असल्यानं तुम्ही कुणाचंही आमच्याशी कनेक्शन लावाल का? असा सवाल सुनील राऊत यांनी केला आहे. उद्या मीही ईडीच्या अधिकाऱ्यांवर आरोप केला तर त्याही खऱ्या मानायच्या का? असा सवालही त्यांनी केला आहे. संजय राऊत यांची जबाब नोंदणी सुरू आहे. जे सत्य आहे, तेच राऊत साहेब सांगतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीही आमच्या पाठीशी उभी आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ईडीने सांगितलं ना राऊत या घोटाळ्याचे सर्वेसर्वा आहेत. पण त्याला काही पुरावा आहे का? ज्याचं नाव राऊत आहे ते सर्व काय आमच्याशी कनेक्टेड होतात का? प्रवीण राऊतांवर गुन्हा दाखल झाला. चार्जशीट दाखल केलेली आहे. त्यांच्याबाबत जे व्हायचं ते होईल. प्रवीण राऊतला अटक कधी केलं ते पाहा. आठ नऊ महिने झाले अटक करून त्यावेळी संजय राऊतांचं नाव आलं नाही. या पाच सहा दिवसातच आलं. हे सर्व राजकारण आहे. संजय राऊत भाजपच्या विरोधात बोलत होते. त्यामुळे त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. उद्धव ठाकरेंना कमजोर करायचं आहे. त्यामुळेच बोगस प्रकरण त्यांच्यामागे लावण्यात आलं आहे. ईडी काहीही आरोप लावेल. मीही उद्या ईडीवर आरोप करू शकतो, असा टोला राऊतांनी लगावला.
शिवसेना संपूर्णपणे आमच्या पाठी आहे. शरद पवार साहेबांनी स्टेटमेंट दिलं आहे, सुप्रिया सुळेंचा फोन आला होता. राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी तुमच्या सोबत आहे. तुम्ही एकटे नाही. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या, असंही त्यांनी सांगितलं. आज अनिल देसाईंनी राज्यसभा बंद पाडली. तर सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत वेलमध्ये येऊन निषेध नोंदवला. उद्धव ठाकरे राऊतांना कधीच एकटे पडू देणार नाहीत. तुम्ही चिंता करू नका, असंही ते म्हणाले.