मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या आमदारांसह वेगळा गट तयार केला. त्यानंतर त्यांच्यासह नऊ जण शिवसेना-भाजप सरकारसोबत आले. अजित पवार यांच्या गटात आलेल्या आमदारांमध्ये विधानसभा उपाध्यक्ष आणि नाशिक जिल्ह्यातील आमदार नरहरी झिरवळसुद्धा आहेत. परंतु त्यांनी केलेले वक्तव्य आज चर्चेत आले. त्यांच्या या वक्तव्यानंतर संजय शिरसाट चांगलेच संतापले. त्यांनी खोचक शब्दांत त्यांच्यावर टीका केली आहे.
शिंदे गटासह ठाकरे गटातील आमदारांना अपात्र प्रकरणात कारवाई सुरु झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांना नोटीस पाठवत पुढील सात दिवसात म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले आहेत. त्यावर बोलताना अजित पवार गटातील आमदार अन् विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेचे 16 आमदार अपात्र ठरतील, असं वक्तव्य केलं आहे. त्यावरुन वाद सुरु झाला आहे.
सत्तेत सहभागी झाल्यावरही नरहरी झिरवळ यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली. आमच्या पैकी कुणीही अपात्र होणार नाही. त्यामुळे झिरवळ यांनी सांभाळून बोललं पाहिजे, तुम्हाला जो अधिकार नाही, त्या अधिकारावर माणसानं बोलू नये, असे शिरसाट यांनी झिरवळ यांना सांगितले आहे. निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देऊ शकते. पण शिवसेना नाव नाही, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला. त्यावर बोलताना शिरसाट म्हणाले, शिवसेना ही काय तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना व्हिसी घ्यायला वेळ होता. ठेकेदारांना भेटायला वेळ होता. मात्र फक्त आमच्यासाठी वेळ नव्हता. त्यामुळे त्यांच्यांवर ही परिस्थिती आली. आता त्यांनी बोलणं बंद करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं गेल्याच्या बातम्या आल्या आहेत, त्यावर विचारलेल्या प्रश्नावर संजय शिरसाट यांनी म्हटले की, अजून खातेवाटप झालेले नाही. तिन्ही नेते मिळून निर्णय घेणार आहे. तसेच येत्या दोन दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यावेळी सर्व काही स्पष्ट होणार आहे.