साताराः महाविकास आघाडीतील महत्त्वाचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मोठं विधान केलं आहे. साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच (Nationalist Congress party) असेल, असं वक्तव्य केलं. मुंडेंच्या या वक्तव्यामुळे अवघ्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरीही राज्याची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या रिमोट कंट्रोलवर चालते. तसेच उद्धव ठाकरे हे केवळ नामधारी मुख्यमंत्री आहेत, सगळी सूत्र राष्ट्रवादी काँग्रेस हलवते असे आरोपही अनेकदा केले जातात. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.
साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, ‘ पवार साहेबांनी माझ्यावर विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी दिली होती. पाच वर्ष विरोधी पक्ष नेता म्हणून मी ती जबाबदारी पार पाडली. कितीही मजबूत सरकारी पक्ष असला तरी त्याला गदागदा हलवायचं काम मी केलं. आज शब्द देतोय.. सामाजिक न्याय व विशेष विभागाचा मंत्री म्हणून.. येणाऱ्या काळात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचं मंत्रीपद द्यायचं कुणाला? जे कुणी मुख्यमंत्री असतील … ते आपलेच असतील…’ असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं.
धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावरून विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, ‘2024 पर्यंत महाविकास आघाडीचं सरकार आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहतील. निवडणुकीनंतर जी परिस्थिती समोर येईल, त्यावर तेव्हाच चर्चा करता येईल. प्रत्येक पक्षानं त्याकरिता प्रयत्न करणं काहीही चुकीचं नाही….
पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल-धनंजय मुंडे
संजय राऊत व त्यांच्या सेनेने काय धूनी भांडी करायची का मग तुमची ?
हा टोमणे सेनेचा नाही तर महाराष्ट्राचा अपमान आहे.आणि तो सहन केला जाणार नाही.
खंजीर,कोथळा,वाघनखे,मर्द,मावळा सह उद्याचा टोमणे अग्रलेख वाचा.
अर्थात दै.सामना नव्हे टोमणा.— Gajanan Kale (@GajananKaleMNS) June 4, 2022
मनसेचे नेते गजानन काळे यांनीही मुंडेंच्या वक्तव्यावर खरमरीत प्रतिक्रिया दिली आहे. पुढचा मुख्यमत्री राष्ट्रवादीचा असेल तर संजय राऊ व त्यांच्या सेनेनं काय धुणी भांडी कारयची का तुमची? हा टोमणे सेनेचा नाही तर महाराष्ट्राचा अपमान आहे. तो सहन केला जाणार नाही. उद्या खंजीर, कोथळा, वाघनखे, मर्द, मावळासह टोमणे अग्रलेख वाचा…. अशा शब्दात गजानन काळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.