नवी दिल्ली: राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) घटनापीठासमोर सुनावणी सुरू असतानाच शिंदे गटाने मोठी खेळी खेळली. शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी थेट धनुष्यबाण हे चिन्हं गोठवण्यात यावं असा युक्तिवाद केला. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र, कोर्टाने शिंदे गटाचा हा युक्तिवाद मान्य केला नाही. या संदर्भात निवडणूक आयोग आणि शिवसेनेची (shivsena) बाजू ऐकून घेतली जाणार आहे. त्यानंतरच घटनापीठ या प्रकरणावर सुनावणी करणार आहे. या प्रकरणावर आता येत्या 27 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यावेळी निवडणूक आयोगासह (election commission) तिन्ही पक्षकारांना थोडक्यात युक्तिवाद करण्याचे निर्देशही कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणावर काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठासमोर आज पहिल्यांदाच महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुनावणी झाली. यावेळी शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी धनुष्यबाण हे चिन्हं गोठवा, अशी मागणी घटनापीठासमोर केली. शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनीही यावेळी युक्तिवाद केला. जे लोक विधानसभेत अपात्र होऊ शकतात. ते निवडणूक आयोगाकडे जात आहेत. त्यांना निवडणूक आयोगाकडे जाण्याचा कोणताही अधिकार नाही. जर शिंदे गटाला निवडणूक चिन्ह मिळालं तर सर्व प्रकरण व्यर्थ होईल, असं कपिल सिब्बल म्हणाले. त्यावर, आमदार असो वा नसो, प्रत्येकजण पक्षावर दावा करू शकतो, असा युक्तिवाद कौल यांनी केला.
पक्षाच्या चिन्हावरून निवडणूक आयोगाची कारवाई थांबली आहे. त्यामुळे ही स्थगिती उठवावी, अशी मागणीही नीरज कौल यांनी केली. आम्ही आमचं संवैधानिक कर्तव्य पार पाडत आहोत. ते रोखलं जाऊ शकत नाही. आमदार कोण आहेत आणि कोण नाहीत हे आम्ही पाहत नाही. केवळ पक्षाचा सदस्य असणे हे महत्त्वाचं आहे, असं निवडणूक आयोगाचे वकील अरविंद दातार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगासह तिन्ही पक्षकारांचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने तिन्ही पक्षकारांना प्रत्येकी दोन पानी संक्षिप्त युक्तिवाद सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर 27 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. या संपूर्ण प्रकरणाची मर्यादाही 27 सप्टेंबर रोजीच ठरवली जाणार आहे. त्याच दिवशी निवडणूक आयोगाच्या बाबींवर सर्वांचे युक्तिवाद ऐकून त्याच दिवशी हे प्रकरण निकाली काढणार असल्याचं चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.
1. धनंजय चंद्रचूड
2. न्या.एम आर शहा
3. न्या. कृष्ण मुरारी
4. न्या.हिमाकोहली
5. न्या. पी नरसिंहा