माजी आमदार रमेश कुथे यांनी अखेर भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. कुथे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटात प्रवेश केल्यावर रमेश कुथे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान जिव्हारी लागलं आणि त्यामुळेच आपण पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मला भाजपने बेवकूफ बनवल्याची घणाघाती टीकाही कुथे यांनी यावेळी केली. ते मीडियाशी संवाद साधत होते.
फेब्रुवारी 2024 मध्ये चंद्रशेखर बावनकुळे नागपूरला आले होते. आपल्याकडे येणाऱ्यांची खूप मोठी लाईन आहे, असं त्यांनी मला सांगितलं होतं. 100 जण आपल्याकडे येतील आणि पाच जण जातील. त्याने आपल्याला फरक पडत नाही. त्याच दिवशी कळलं की भाजपने आपल्याला बेवकूफ बनवलं, असं माजी आमदार रमेश कुथे म्हणाले.
मी आधी शिवसेनेत होतो आणि पुन्हा एकदा शिवसेनेत आलो आहे. 2019मध्ये मी भाजपला विधानसभेचे तिकीट मागितलं होतं. मला त्यांनी तिकीट दिलं नाही. त्यानंतर मी जिल्हा परिषद सभापतीसाठी माझ्या मुलाचं नाव समोर केलं होतं. तेव्हा सुद्धा त्यांनी मुलाला तिकीट नाकारलं. त्यानंतर माझा मुलगा अपक्ष म्हणून उभा राहिला आणि सभापती झाला. आता सुद्धा मला ते तिकीट देणार नव्हते. त्यामुळे इथे राहून उपयोग नव्हता, असं रमेश कुथे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांना मी विधानसभेची उमेदवारी मागितली आहे. ते मला तिकीट देतील याची शंभर टक्के खात्री आहे, असं सांगतानाच माझा मुलगा सध्या तरी अपक्षच राहणार आहे, असं कुथे म्हणाले.
शिवसेनेकडून दोन वेळा आमदार राहिलेले रमेश कुथे यांनी अखेर शिवसेना पक्षात घर वापसी केली आहे. 2019 मध्ये रमेश कुथे यांनी शिवसेना सोडत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. आता सहा वर्षानंतर भाजपला सोडचिठ्ठी देत गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे यांनी आज मुंबईत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून घरवापसी केली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर त्यांचा पक्षप्रवेश झाला. रमेश कुथे हे 1995 आणि 1999 असे दोन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक जिंकले होते. त्यानंतर 2004 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसच्या गोपालदास अग्रवाल यांनी पराभूत केलं होतं.
2019 मध्ये रमेश कुथे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते राज्यातील भाजप नेत्यांवर नाराज होते. मध्यंतरी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली होती. त्यावेळी ते काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. पण, त्यांनी शिवसेना ठाकरे गटात घरवापसीचा निर्णय घेतला. ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर गोंदियात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठी ताकद मिळाली आहे.