रवी लव्हेकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पंढरपूर: डोंगर झाडी फेम शिंदे गटाचे (shinde camp) आमदार शहाजीबापू पाटील (shahaji bapu patil) यांना गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी भाषणाला बोलावलं जात आहे. एक डायलॉग फेमस झाल्यानंतर शहाजीबापू पाटील यांचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं आहे. रातोरात प्रसिद्ध झाल्यानंतर आमदार म्हणून त्यांची सर्वत्र डिमांडही वाढली आहे. तेही कुणाला नाराज न करता प्रत्येक ठिकाणी जाऊ भाषण करत आहेत. मात्र, प्रसिद्धीमागचं दु:खं आणि वेदनाही ते बोलून दाखवताना दिसत आहेत. आपल्याला भाषणाला (speech) का बोलावलं जातं? याचा किस्साही शहाजीबापू पाटील सांगताना दिसत आहेत.
शहाजीबापू पाटील पंढरपुरात होते. यावेळी एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी प्रसिद्ध मागचं दु:ख बोलावून दाखवलं. लोकांना वाटतं बापू मोठा झाला. वनवास संपला. आरं नुसतं टीव्हीवर दिसून मोठा होत नाही. अजून बायकोला लुगडं कधी घ्यायच याचा विचार करतोय, असं शहाजीबापू पाटील म्हणाले.
आम्हाला भाषणाला का बोलावतात माहीत आहे का? आम्हाला भाषणाला बोलावून चेअरमनचे कौतुक करायला सांगायचे आणि ते पवार साहेबांनी एकायचे हा आमचा उद्योग होता, असा किस्सा शहाजीबापू यांनी ऐकवताच एकच खसखस पिकली.
साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या सारखा माणूस राजकारणात हवा. शेखर गायकवाड यांनी राजकारणात आलं पाहिजे. त्यांनी एकतर दरेकर यांच्याकडे यावं किंवा शिंदेंकडे यावं, असं मोठं विधान त्यांनी केलं.
दरेकर साहेब मला विधान परिषदेवर घ्या आणि अभिजित पाटील यांना सांगोला मधून आमदार करा, असं आवाहनच त्यांनी आमदार प्रवीण दरेकर यांना केलं. अभिजित पाटील विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. ते राज्यात पाच कारखाने चालवतात.
दरम्यान, शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. या दोन राऊतांनी आमचं वाटोळं केलं. आमच्या सर्वांची वाट लावली, असं ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत कोकणात येऊन आम्ही धुरळा पाडणार आहोत. संजय राऊत निवडणूक लढवत नाहीत. नाही तर त्यांच्याही मतदारसंघात गेलो असतो, असंही ते म्हणाले.
शीख समुदायाकडून शिंदे गटाच्या ढाल-तलवार चिन्हावर आक्षेप घेतला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ऐतिहासिक परंपरा असलेल्या चिन्हावर शिखांनी दावा टाकणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. आज शिखांनी आक्षेप घेतला उदया राजस्थानमधील राजपूत, कर्नाटकातील रेड्डी म्हणतील भावना दुखावल्या. ढाल तलवार हे आमचं चिन्ह आहे, असंही ते म्हणाले.