राहुल झोरी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: शिंदे गटाने धनुष्यबाण मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाला (election commission) पत्रं दिलं आहे. आमचीच शिवसेना (shivsena) खरी आहे. आमच्याकडे संख्याबळ आहे. त्यामुळे आम्हालाच धनुष्यबाण मिळायला हवं, अशी मागणी या पत्रात केली आहे. तर शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री शंभुराज देसाई (shambhuraj desai) यांनी धनुष्यबाण चिन्हावरून मोठं विधान केलं आहे. निवडणूक आयोगाकडे आम्ही दाद मागितली आहे. धनुष्यबाण चिन्हं आम्हालाच मिळायला हवं. आमच्याकडे संख्याबळ आहे. धनुष्यबाण चिन्हंच गोठवलं तर शिंदे साहेब ठरवतील ते चिन्हं घेऊन आम्ही जनतेपर्यंत जाऊ, असं विधान शंभुराज देसाई यांनी केलं आहे.
टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना शंभुराज देसाई यांनी हे विधान केलं आहे. कालच्या दसरा मेळाव्याला लाखोंच्या संख्येने लोक आहे होते. यावरून जनतेचा पाठिंबा कुणाला आहे हे कालच स्पष्ट झालं आहे. लोकमताचा पाठिंबा, जनतेचा पाठिंबा, शिवसैनिकांचा पाठिंबा आम्हाला आहे हे स्पष्ट आहे. त्यामुळे आम्हालाच धनुष्यबाण चिन्हं मिळेल याचा पूर्ण विश्वास आहे. आमची बाजू किती भक्कम आहे. हे आम्ही कागदपत्रानुसार सिद्ध करू शकतो, असा दावा शंभुराज देसाई यांनी केला.
आमच्या मेळाव्याच्या गर्दीवरून आता आमच्यावर आरोप केले जात आहेत. आमच्याकडे जास्त लोक आली. त्यामुळे कुणी खर्च केला? पैसे कुठून आले? अशा गोष्टी उकरून काढल्या जात आहेत. बहुमत आमच्याकडे आहे हे बघून सगळ्या गोष्टी काढल्या जात आहेत. कोल्ह्याला द्राक्ष आंबट, दुसरे काय? अशी टीका त्यांनी केली.
वंदनीय शिवसेनाप्रमुखांचे ज्वलंत विचार काल कुठे होते? फक्त शिंदे साहेबांवर टीका केली. काल तर दीड वर्षाच्या रूद्रांशबद्दलही बोलले. याच्या एवढं दुःख नाही. निरागस बाळावर कुठल्या थराला जाऊन बोलावं त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा नाही, असा हल्लाही त्यांनी चढवला.
यावेळी त्यांनी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावरही टीका केली. एक महिन्यापूर्वी इथ आल्या. थेट उपनेत्या झाल्या. आता आमच्यासारख्या शिवसैनिकांना निष्ठा शिकवणार यासारखं दुर्देव नाही. आता उद्धव ठाकरेंसोबत कुणीच राहिलं नाही. त्यामुळे जो येतो त्याला थेट पद मिळते. मातोश्रीत प्रवेशही मिळतो, असा टोलाही त्यांनी लगावला.
सुषमा अंधारे यांनी आमच्या मतदारसंघात जरुर यावं आणि प्रचार करावा. जनताच त्यांना उत्तर देईल, असंही ते म्हणाले.