औरंगाबाद : वेरुळ मठाचे मठाधिपती शांतीगिरी महाराज हे औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. शांतीगिरी महाराज हे औरंगाबाद शहरापासून जवळ असलेल्या जनार्धन स्वामी मठाचे मठाधिपती आहेत.
वेरुळ हे घृष्णेश्वर या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून ओळखले जाते, तर वेरुळ लेण्यांमुळे हे जगप्रसिद्ध आहे. याच वेरूळ गावात शांतीगिरी महाराजांचा भव्य मठ आहे. जनार्धन स्वामी उर्फ बाबा महाराज हे मठाचे पाहिले मठाधिपती होते.
1989 साली जनार्धन स्वामी यांचे निर्वाण झाले आणि त्यानंतर 25 डिसेंबर 1989 साली शांतीगिरी महाराजांची उत्तराधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. शांतीगिरी महाराज हे संन्यस्त स्वीकारलेले योगी आहेत. आजन्म ब्राह्मचारी राहण्याचं त्यांनी व्रत घेतलं आहे.
शांतीगिरी महाराज हे मूळचे नाशिक जिल्ह्यातल्या लाखलगाव इथले आहेत. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांची दृष्टी गेली होती. त्यामुळे ते वेरूळ येथील जनार्धन स्वामींच्या मठात आले. मठात त्यांची दृष्टी ठीक झाली त्यामुळे ते परत आपल्या गावी गेले, गावी गेल्यानंतर त्यांची पुन्हा दृष्टी गेली त्यामुळे महाराज पुन्हा मठात आले. मठात आल्यानंतर जनार्धन स्वामींनी शांतीगिरी महाराजांना मठातच राहायला सांगितलं, मठात राहून शांतीगिरी महाराजांनी संन्यस्त वृत्त स्वीकारलं, मठातच राहून महाराजांनी विज्ञान शाखेतून पदवीपर्यंतच शिक्षण घेतलं
आज शांतीगिरी महाराज मठाधिपती असलेल्या मठाची करोडो रुपयांची संपत्ती आहे. महाराजांचे देशात 55 ठिकाणी मठ आहेत. तर 9 ठिकाणी गुरुकुल आहेत. आज घडीला मठाकडे शेकडो एकर जमीन आहे. नुसत्या वेरूळ इथल्या मठात महाराजांकडे तब्बल 200 एकर जमीन आहे. महाराजांना फिरण्यासाठी त्यांच्याकडे एसयूव्ही, टाटा सफारीसारख्या महागड्या गाड्या आहेत. तर शांतीगिरी महाराजांचे औरंगाबाद, नगर, नाशिक, धुळे, जळगाव आणि जालना या पाच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भक्त आहेत.
शांतीगिरी महाराज यांनी आपल्या भक्त समुदायाच्या जोरावर 2009 साली लोकसभा निवडणूकही लढवली होती. या निवडणुकीत महाराजांनी तब्बल 1 लाख 48 हजार मतं घेतली होती. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर महाराज तब्बल दहा वर्षे निवडणूकिपासून लांब होते. सध्या शांतीगिरी महाराज राजकारणाचं शुद्धीकरण व्हावं यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. यावेळी बाबांनी भाजप कडून निवडणूक लढवण्यासाठीही चाचपणी केली होती. पण युती झाल्यानंतर महाराजांच्या अपेक्षांवर पाणी फिरलं आणि आता महाराज अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीला लागले आहेत. बाबांच्या सांगण्यावरून बाबांच्या भक्तांनी औरंगाबाद निवडणूक कार्यालयातून दोन उमेदवारी अर्ज सुद्धा घेतले आहेत.
सध्या बाबांच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात भक्तांशी बैठक सुरू आहेत. येणाऱ्या एक तारखेला बाबा एक पत्रकार परिषद घेऊन निवडणूक लढवणार की नाही हे स्पष्ट करणार आहेत. पण बाबांच्या सुरू असलेल्या हालचाली पाहता, बाबांची निवडणूक लढवण्याची तयारी पूर्ण झाली असल्याचं चित्र दिसत आहे.
सध्या औरंगाबाद लोकसभा मतदार संघात शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे, काँग्रेसकडून सुभाष झाम्बड, एमआयएम कडून इम्तियाज जलील तर अपक्ष म्हणून हर्षवर्धन जाधव यांनी शड्डू ठोकलेत. सध्याची राजकीय समीकरणे पाहता ही स्थिती चंद्रकांत खैरे यांना अनुकूल मानली जात आहे. पण शांतीगिरी महाराज जर निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर खैरेंची वाट बिकट होऊ शकते.