पुणे: शिवसेना (shivsena) आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला (Dussehra rally) अवघे दोन दिवस उरले आहेत. या मेळाव्यात दोन्ही गटाकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी दोघांनीही जय्यत तयारी सुरू केली आहे. मेळाव्यापूर्वी दोन्ही गटाकडून एकमेकांवर तोंडसुखही घेतलं जात आहे. तसेच दोन्ही गटात टीझर आणि बॅनर वॉरही सुरू झालं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी दोन्ही गटाच्या नेत्यांना वडिलकीचा सल्ला दिला आहे. दोन्ही नेत्यांनी मेळावा घ्यावा. शक्ती प्रदर्शन करावं. पण भाषण करताना मर्यादा ओलांडू नये. एकमेकांमध्ये कटूता निर्माण होईल असं काही करू नये, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.
शरद पवार हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी हे आवाहन केलं. तसेच राष्ट्रवादीचा शिवसेनेच्या मेळाव्याशी काहीच संबंध नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
दुर्देवानं एका पक्षाचे दोन भाग झाले. त्यात स्पर्धा सुरू झाली. ती स्पर्धा सुरू झाल्यानंतर त्या स्पर्धेची सूत्रे दसऱ्या मेळाव्याच्या माध्यमातून स्वीकारले गेले. या गोष्टी नवीन नाही. संघर्ष होतो. ते नवीन नाही. पण त्याला काही मर्यादा ठेवली पाहिजे. ती मर्यादा ओलांडून होत असेल तर राज्याच्या दृष्टीने चांगलं नाही, असं शरद पवार म्हणाले.
राज्यातील जी जबाबदार मंडळी आहेत. त्यांनी हे वातावरण दुरुस्त करायला पावलं टाकली पाहिजे. ती पावलं टाकायची जबाबदारी आमच्यासारख्या सीनियर लोकांवर आहेच. पण त्याही पेक्षा राज्याचे प्रमुख आहेत. ते पक्षाचे प्रमुख असतील, पण ते राज्याचे प्रमुख आधी आहेत. त्यांच्यावर जबाबदारी अधिक आहे.
अपेक्षा करूया की उद्या ते काही मांडणी करतील. त्यातून कटुता निर्माण होणार नाही. याची काळजी दोन्ही बाजूने घेतली तर राज्यातील वातावरण सुधारायला मदत होईल, असंही त्यांनी सांगितलं.
शिवसेनेच्या मेळाव्याशी राष्ट्रवादीचा काहीच संबंध नाही. या सर्व गोष्टीत राष्ट्रवादीचा काहीच संबंध नाही. हा शिवसेनेचा कार्यक्रम आहे. दुसरा कार्यक्रम शिंदे यांच्या सेनेचा आहे. त्यात अन्य पक्षाचं काम नाही, असं त्यांनी सांगितलं.