अहमदनगर : जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या भूमीपूजनासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार एकाच मंचावर आले होते. त्यावेळी शरद पवारांनी नितीन गडकरींच्या कार्यशैलीचं मुक्तकंठाने कौतुक केलं. पेट्रोल-डीझेलच्या वाढते दर आणि प्रदुषणाच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे साखर कारखान्यात इथेनॉल निर्मितीवर भर देण्यास सांगत आहेत. गडकरींचा हा धागा पकडत शरद पवार यांनी आता गडकरींना पुढचा पर्याय सांगितलाय. (Sharad Pawar advises Nitin Gadkari to focus on production of hydrogen gas in sugar factories)
ऊसापासून साखर हे सूत्र आता कमी करावं लागेल आणि इथेनॉल निर्मिती क्षेत्रात आपल्याला जावं लागेल. याबाबत गडकरी लक्ष घालतील अशी अपेक्षा आहे. इथेनॉल ऐवजी हायड्रोजन गॅस निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हायड्रोजन हे इथेनॉलच्या पुढची अवस्था आहे. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली आहे.
पवारांनी नगरमधील आजचा कार्यक्रम म्हणजे जिल्ह्याच्या विकासाला दिशा देणारा कार्यक्रम असल्याचं म्हटलंय. मला दुसरीकडे एक कार्यक्रम होता. पण मला रोहित पवार यांच्याकडून निरोप मिळाला की गडकरी यांनी मी यावं असं सांगितलं आहे. त्यामुळे मला येणं भाग पडलं. इतर कार्यक्रमात गेलं की वर्षानुवर्षे काही बदल दिसत नाही. पण गडकरी यांच्या कार्यक्रमाला गेलं की दोन चार दिवसांत फरक पडलेला दिसतो, अशा शब्दात पवारांनी गडकरींच्या कार्यशैलीचं मुक्तकंठाने कौतुक केलं.
सगळ्या वाहतुकीत रस्त्यावरची वाहतूक समाजाच्या हिताची असते. हे काम गडकरी यांनी आपल्या हातात घेतलं आहे. गडकरी यांनी ही जबाबदारी घेण्यापूर्वी देशात 5 हजार किलोमीटर काम होत होतं. ते आता 12 हजार किलोमीटरवर गेलं आहे. मी शक्यतो रस्त्याने प्रवास करण्याचा प्रयत्न करतो. एखादा नेता देशाच्या उभारणीत कसं योगदान देतो हे गडकरी यांच्याकडे पाहून लक्षात येतं. कोणताही लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे गेला तर ते त्याला पक्ष न पाहता मदत करतात, असंही पवार म्हणाले.
अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हजारो एक शेती पीक नष्ट झालं आहे. शेतकऱ्यांना वाटतं की आज खऱ्या अर्थानं आधार देणारं पीक हे ऊस आहे. सध्या एकच पीक घेण्याची प्रवृत्ती शेतकऱ्यांमध्ये वाढली आहे, ते पीक म्हणजे ऊस. अशावेळी ऊसापासून साखर हे सूत्र आता कमी करावं लागेल आणि इथेनॉल क्षेत्रात आपल्याला जावं लागेल. याबाबत गडकरी लक्ष घालतील अशी अपेक्षा असल्याचं पवार म्हणाले.
इतर बातम्या :
शरद पवारांसोबत एकत्र येणं टाळलं, गडकरींच्या कार्यक्रमाला राधाकृष्ण विखेंची दांडी
पुणे विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार, पवार-गडकरींमध्ये चर्चा; गिरीश बापटांचं गडकरींचा पत्र
Sharad Pawar advises Nitin Gadkari to focus on production of hydrogen gas in sugar factories