सोलापूर : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सोलापुरात एकाच हॉटेलमध्ये थांबल्याने, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सोलापुरात एकच पंचरांकित हॉटेल आहे, यात दोन्ही दिग्गज नेते मुक्कामी आहेत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे काल (15 एप्रिल) बीड, उस्मानाबादच्या दौऱ्यावर होते. त्यानंतर ते सोलापुरात आले. सोलापुरात एकच पंचतारांकित हॉटेल असल्याने शरद पवार त्या हॉटेलमध्ये थांबले. दुसरीकडे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल सोलापुरात जाहीर सभा होती. या सभेनंतर राज ठाकरे हे पवार थांबलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्येच वास्तव्यास आले.
शरद पवार आणि राज ठाकरे हे दोन्ही नेते एकाच हॉटेलमध्ये असले, तरी त्यांची अद्याप भेट झाली नसल्याचे म्हटले जात आहे. मात्र, दोन्ही नेते योगायोगाने एकाच हॉटेलमध्ये वास्तव्यास असल्याने राजकीय वर्तुळात मात्र चर्चेला उधाण आलं आहे. याआधीही शरद पवार आणि राज ठाकरे यांनी औरंगाबाद ते मुंबई असा एकत्रित विमान प्रवास ‘योगायोगाने’ केला होता.
राज ठाकरे यांचा मनसे पक्ष लोकसभा निवडणूक लढवत नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात राज ठाकरे हे राज्यभर सभा घेऊन, प्रचार करत आहेत. या प्रचाराचा फायदा अर्थात काँग्रेस-राष्ट्रवादीला होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राज ठाकरेंचा मनसे पक्ष म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीची बी टीम अशीही भाजपकडून टीका होत असताना, राज ठाकरे आणि शरद पवार सोलापुरात एकाच हॉटेलमध्ये थांबल्याने अर्थात पुन्हा चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.
शरद पवार आणि राज ठाकरे हे दोघेही एकाच हॉटेलमध्ये असले, तरी भेटले नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, सकाळी त्यांची भेट झाल्यास, पुढे माध्यमांशी संवाद साधून या भेटीबाबत काही बोलतील का, हेही पाहणे महत्त्वाचे ठरेल. तूर्तास, या ‘योगायोगाची’ सध्या राजकीय वर्तुळात तुफान चर्चा होत आहे.
संबंधित बातम्या :
राज ठाकरेंनी भरसभेत टीव्ही 9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट दाखवला
राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे पुण्यातले मनसे कार्यकर्ते संभ्रमात?