मुंबई : राज्य आणि देशपातळीवरील प्रमुख नेत्यांपैकी एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचा आज 81 वा वाढदिवस (Birthday). या निमित्त सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांसह भाजप नेत्यांनीही शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच त्यांच्या प्रकृती स्वास्थ्याबद्दल सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. त्यानंतर आज शरद पवार यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन (Instagram Post) सर्वांचे आभार मानले आहेत. ‘आज वाढदिवसानिमित्त नेहरू सेंटरला आयोजित कार्यक्रमात सर्वांनी माझ्यावर शुभेच्छांच्या केलेल्या वर्षावाने भारावून गेलो आहे. ८१व्या वाढदिवसाला कार्यक्रम असावा असे काही मला वाटत नव्हते. पण पक्षाने आणि अध्यक्षांनी निर्णय घेतला व तुम्ही सर्वांनी प्रेमाने कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल मी अंतःकरणापासून आपला आभारी आहे’, असं पवार म्हणाले.
‘आज खऱ्या अर्थाने काही गोष्टींच्या संदर्भातील निकाल आपल्याला घ्यावा लागेल. पक्ष लहान असेल, मर्यादित कार्यकर्ते असतील, पण बांधिलकी असलेले कार्यकर्ते हे राष्ट्रवादीचे वैशिष्ट्य आहे. आज असंख्य प्रश्न देश आणि सामान्य लोकांसमोर आहेत. त्याचे उत्तर शोधण्यासाठी प्रभावी नीतीने काम करणारा पक्ष आणि कार्यकर्ता कोणता, हा प्रश्न समोर आला असता लोकांनी आपल्याच पक्षाचे नाव घ्यावे अशा पद्धतीने पक्षाची बांधणी करावी लागेल’, असं पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणाले.
‘काल मी सांगितलेली लहानशी कविता मला पूर्ण आठवत नाही. कदाचित त्या कवीचे नाव मोतीलाल राठोड असावे. मोतीलाल बंजारा समाजातील विद्यार्थी होता. मोतीलालशी संवाद साधताना त्याने लिहिलेली कविता ऐकवली. कवितेचे नाव होते ‘पाथरवट’. पाथरवट म्हणजे छिन्नी हाती घेऊन हातोडीने दगड फोडणारे पाथरवट. या कवितेचे मर्म असे होते की, ज्या व्यक्तीच्या हातांनी दगडातून मूर्ती घडवली त्याच व्यक्तीला मंदिरात येऊ दिले जात नाही. ही तुमची समाज रचना आम्हाला उद्ध्वस्त करायची आहे, अशी या कवितेमागची भावना होती. अशी एखादी कविता ऐकल्यानंतर रात्री झोप येत नाही. आपण स्वतः गुन्हेगार असल्याची भावना निर्माण होते. समाजातील उपेक्षित, वंचितांवर जे अन्याय झाले ते दूर करण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्नांची पराकाष्ठा करणे आज गरजेचे आहे. अशा कविता ऐकल्यावर जो अस्वस्थ होतो तो पक्षाचा खरा कार्यकर्ता आहे’.
‘पंधरा दिवसांपूर्वी मी विदर्भ दौरा केला. या भागातील आदिवासी लोक अनेक संकटांना तोंड देतात. नक्षलवादाचा त्रास आहे. यातून मार्ग काढून आज तेथील तरुण पिढी शिक्षित होण्याचा, पुढे जाण्याचा प्रयत्न करतेय. राजकीय विचारांबाबत त्यांच्याशी बोललो तर त्यांना राष्ट्रवादीचा विचार जवळचा वाटतो. त्यांची एवढीच अपेक्षा आहे की, या जगात सन्मानाने जगण्याचा आमचा अधिकार आम्हाला द्या. माझे आग्रहाचे सांगणे आहे की, पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्ते तयार होतात. संधी मिळून काही लोक विधिमंडळ, लोकसभेत जातात. पण त्यासोबत अस्वस्थ माणसाच्या सुख-दुःखात जो समरस झाला नाही तो खरा कार्यकर्ता नाही. म्हणून या घटकांशी बांधिलकी हे सूत्र मनात ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहीजे’, असा सल्लाही पवारांनी यावेळी दिलाय.
इतर बातम्या :