अभिजित पोते, पुणे, दि. 11 फेब्रुवारी 2024 | आज जमाना तरुणांचा आहे. राजकारण तरुणांच्या हातात आहे.
शरद पवार आणि त्यांच्या सोबती असणाऱ्यांना या सर्वांनी पुनर्विचार करायला हवा. त्यांनी पुनर्विचार केला नाही तर किमान थांबायला हवे. तुमच्या पुढे काय ठेवले ते पहा. मी पण राष्ट्रवादी पक्षाच्या जन्मापासून पक्षात होतो. मात्र आता महिला, पुरुष आणि तरुणांचे जे संघटन अजितदादांच्या माध्यमातून उभारले आहे ते पहा आणि पुनर्विचार करा, असा सल्ला अन् हल्ला ओबीसी नेते आणि अजित पवार गटाचे पदाधिकारी छगन भुजबळ यांनी केला. पुणे येथील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी शरद पवार यांना सल्ला दिला. यापूर्वी अजित पवार यांनीही भुजबळ यांना थांबण्याचा सल्ला दिला होता.
कर्जत जामखेडचे तरुण जाणते नेते आहेत. ते स्वतःला तरुणांचे नेते मानतात. पण त्यांच्या आजूबाजूला पगारी तरुण असतात, इथं बघा स्वयंस्फूर्तीने आलेले आहेत, असा हल्ला आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता छगन भुजबळ यांनी केला. ते म्हणाले, कोण म्हणतं पक्ष चोरला, कोणी आणखी काही म्हणते. मात्र लक्षात ठेवा लोकशाही आहे. ज्याच्या बाजूने बहुमत आहे, त्यांच्याबाजूने निर्णय लागतो. म्हणूनच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह ही मिळाले आहे.
राष्ट्रवादी पक्षाला आता हे जे चिन्ह मिळाले, त्याचा सगळा वाटा माझा आहे. कारण हे चिन्ह मिळविण्यात मी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, त्यामुळं आता वाईट वाटून घ्यायचं कारण नाही, असे छगन भुजबळ यांनी म्हटले. पक्षातील कार्यकर्त्यांना सल्ला देताना त्यांनी म्हटले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. यात जीव तोडून काम करावे. आपल्या कामाचा हिशोब केला जाईल. स्थानिक स्वराज्य निवडणुकीत याचा विचार केला जाईल. एकमेकांचे पाय खेचणे बंद करा. खेकड्याच्या वृत्तीने काम करू नका. संकटं खूप येणार, अडचणी येणार. काळजी करू नका.
आपण जरी भाजप सोबत गेलो असलो तरी आमची विचारसारणी तीच आहे. त्यात बदल झाला नाही. भाजपनंतर राज्यात दोन नंबरचा आपला पक्ष आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची आधीपासून भूमिका आहे. आम्ही दरवेळेस पाठिंबा दिला आहे. अजूनही देऊ,आता देखील मराठा आरक्षणासाठी खंबीर पाठिंबा देऊ. परंतु कुठल्याही एका समाजाला दुखावून चालणार नाही. सगळ्या समजाला सोबत घेऊन पुढे जावं लागेल.
आता अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचे आहे. त्यामुळे सगळी शक्ती घेवून पुढे जावे लागणार आहे. पाय घसरला तर उभा टाकता येतो. मात्र जीभ घसरली तर आयुष्यभर माणूस उठू शकत नाही. कुणालाही दुखवू नका, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.