औरंगाबाद: ज्या मराठवाडा विद्यापीठाचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ करण्यासाठी सत्तेवर पाणी सोडावं लागलं. त्याच विद्यापीठाने तब्बल 32 वर्षानंतर डी. लिट देऊन गौरव केल्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अत्यंत भावूक झाले. या सोहळ्यात पवार काही क्षण स्तब्ध झाले होते. खासकरून जेव्हा त्यांच्या योगदानाचा आढावा घेतला जात होता, तेव्हा शरद पवार भावूक झालेले पाहायला मिळाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि डी. लिट पदवी देऊन गौरव केला. कुलपती आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते या दोन्ही नेत्यांना डी. लिट देऊन गौरवण्यात आलं. शरद पवार आणि नितीन गडकरी सकाळीच या सोहळ्यासाठी औरंगाबादला पोहोचले होते.
शरद पवार यांना डी. लिट देण्यापूर्वी त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी डॉक्यूमेंट्री दाखवण्यात आली. ही डॉक्यूमेंट्री दाखवताना शरद पवार यांचं नामांतर विस्तार आंदोलनातील योगदान अधोरेखित करण्यात आलं. ज्यावेळी पवारांच्या नामविस्तार आंदोलनाचा डॉक्यूमेंट्रीतून आढावा घेतला जात होता. तेव्हा शरद पवार भावूक झालेले पाहायला मिळाले. त्यांच्या चेहऱ्यावरचे भावपूर्णपणे बदलून गेले होते.
त्यानंतर शरद पवार यांना डी. लिट प्रदान करण्यात आली. नंतर पवारांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठवाडा आंदोलनातील आठवणींसह विद्यापीठाच्या निर्मिती प्रक्रियेपासूनच्या घटनांना उजाळा दिला.
मी अंतकरणापासून विद्यापीठाचे कुलगुरू आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा मी मनापासून आभारी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे राज्यातील ऐतिहासिक विद्यापीठ आहे. मला या विद्यापीठाच्या निर्मितीचा कालखंड आठवतोय.
त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि घटनेच्या माध्यमातून संसदीय लोकशाही मजबूत करण्याची मोठी कामगिरी केली ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोघांचा विद्यापीठाशी मोठा संबंध होता, असं शरद पवार म्हणाले.
या भागात त्या काळात शैक्षणिक क्षेत्रात प्रगती नसताना बाबासाहेबांनी या कामात त्यांनी लक्ष घातलं. ते स्वत: औरंगाबादला राहिला. मिलिंदचा सर्व कँम्पस उभा करण्याची मोलाची कामगिरी त्यांनी केली. हा शैक्षणिक क्षेत्राच्या इतिहासाचा भाग आहे, असं त्यांनी सांगितलं.
शेतीच्या बरोबर उद्योगाच्या आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तयार होणारी संस्था आपण उभी करत आहोत. येत्या सहा महिन्यात त्याला गती मिळेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.