योगेश बोरसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 2 डिसेंबर 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. शरद पवार यांच्या धरसोड वृत्तीवर टीका केली होती. तसेच पवारही भाजपसोबत जायला तयार होते. तीन चार वेळा चर्चा करूनही त्यांनी कच खाल्ल्याचा दावाही त्यांनी केला होता. अजितदादा यांच्या या दाव्यावर शरद पवार काही तरी बोलतील अशी चर्चा होती. पण शरद पवार यांनी कार्यकर्त्यांशी संबोधित करताना अजितदादा यांच्या विधानाला फारशी किंमत दिली नाही. त्यांनी कोणत्याही आरोपाचं खंडन केलं नाही किंवा त्यावर खुलासा दिला नाही. उलट त्यांच्या विधानाकडे लक्ष देऊ नका, असं शरद पवार म्हणाले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्यात शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या विधानावर सखोल बोलणं टाळलं. जे काही घडलं त्याची चिंता करण्याचं कारण नाही. त्यामुळे संघटना अधिक स्वच्छ झाली. नवीन लोकांना संधी देण्याची परिस्थिती निर्माण झाली. युवकांची संघटना मजबूत केली तर उद्या विधानसभेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसची फळी मोठ्या प्रमाणावर निवडून येईल. ते राज्य चालवू शकतात हे दिसेल. ही संधी तुम्हाला मिळाली आहे. त्याची नोंद घेऊन तुम्ही ज्या विधानसभेच्या कार्यक्षेत्रात राहता तिथे संपर्क ठेवा. प्रत्येक गावात कसं जाणार आणि कार्यकर्त्यांची फळी कशी उभी राहील यावर भर द्या. हे काम केल्यावर नेतृत्वाची नवी फळी निर्माण होईल. हे कर्तृत्व तुमच्यात आहे. संघटना मजबूत करा, असं आवाहन शरद पवार यांनी केलं.
काही लोकांनी नवीन प्रश्न उपस्थित केले आहेत. टीका टिप्पणी केली. पक्ष घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून माझ्यावर टीका होते. त्याचा फारसा विचार करण्याची गरज नाही. लोकांमध्ये गेल्यावर लोक उद्या अनेक प्रश्न विचारतील यापासून लक्ष विचलित करण्यासाठी आपल्यावर हल्ला करण्याचं सूत्र त्यांनी अवलंबलं आहे, असा दावा शरद पवार यांनी केला.
यावेळी शरद पवार यांनी एक किस्सा ऐकवला. 1978 साली निवडणुका झाल्या. मी तरुणांना संधी दिली होती. निकाल लागला होता. 60 लोक निवडून आले. निवडणूक झाल्यावर सरकार दुसऱ्यांचं आलं. काही दिवसांसाठी मी परदेशात गेलो होतो. त्यानंतर परत आलो. तेव्हा लक्षात आलं. 60 आमदार निवडून आले होते. फक्त सहा शिल्लक राहिले. बाकीचे सर्व इतर पक्षात गेले. 60 वरून 6 वर आलो. लोकांना वाटत होतं. हा विचार संपेल. पण हा विचार गांधी नेहरू, यशवंतराव चव्हाण, फुले, आंबेडकारांचा होता. तो संपू शकत नाही.
मी नंतर नवी पिढी उभी केली होती. आम्ही परत निवडून येऊ अशी खात्री आम्हाला होती. नंतर निवडणुका झाल्या. त्यातील 60 लोकांपैकी 51 ते 52 लोक निवडणुकीत पराभूत झाले. याचा अर्थ लोकांना हा निर्णय आवडला नव्हता. पुन्हा एकदा आम्ही नवीन पिढी उभी केली. त्यानंतर 76 लोक निवडून आले. राज्याच्या राजकारणाला वेगळं वळण गेलं. कोण गेलं याची चिंता करण्याची गरज नाही. सामान्यांसोबत जे राहतात त्यांच्यासोबत लोक राहतात. या निवडणुकीतही तेच दिसेल, असं त्यांनी सांगितलं.
सत्ता येते आणि जाते. सत्ता जेव्हा जाते तेव्हा नव्या उमेदीनं उभं राहण्याची भूमिका घेतली तर सामान्य लोकांचा पाठिंबा मिळतो. सत्तेससाठी अन्य ठिकाणी गेलेल्यांवर लोकांचा विश्वास नसतो. तुम्ही कुणाबरोबर गेला. कुणाच फोटो वापरला, तुम्ही कुणाचं नेतृत्व स्वीकारलं, तुम्ही आज कुठे आहात आणि तुमचा अजेंडा काय असं लोक विचारत असतात. लोकांमध्ये परिवर्तनाची धमक आहे. ही परिवर्तनाची लढाई पुढे न्यायची आहे, असं शरद पवार म्हणाले.