मराठा आणि ओबीसी आरक्षणात काय चुकतय? ती चूक सुधारण्यासाठी काय केलं पाहिजे? तो सल्ला शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिला. “मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाली. या प्रश्नात मार्ग निघायला पाहिजे असं मला वाटतं. सरकारने जो संवाद साधला पाहिजे होता, तो झाला नाही असं मला वाटतं, असं मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. जरांगे आणि त्यांच्या बरोबर मुख्यमंत्री आणि इतर लोक संवाद ठेवत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. पण दुसरे जे घटक आहेत, जे जरांगेंना विरोध करत आहेत, त्यांच्याशी सरकारमधील दुसरे लोक सुसंवाद ठेवत आहेत हे कशासाठी? त्यांनी दोन्ही समाजाला विश्वासात घेऊन चर्चा करावी” असं शरद पवार म्हणाले.
“त्यांनी ओबीसींशी चर्चा करायला छगन भुजबळ यांना सांगायचं, दुसऱ्यांशी स्वत: चर्चा करायची. काही लोकांना बाजूला ठेवायचं. कारण नसताना त्यातून गैरसमज होतात आणि परिस्थिती हवी तशी राहत नाही. त्यासाठी मला वाटतं सरकारने सुसंवाद ठेवण्याची तयारी आहे हे आम्हाला सांगितलं. त्यासाठी आम्ही सूचवलं जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बोलवा. ओबीसी आरक्षणाचा आग्रह धरणारे भुजबळ आणि हाके तसेच त्यांच्या सहकाऱ्यांना बोलवा. आम्हाला बोलवा. त्यावर आपण सामूहिक चर्चा करून मार्ग काढू. त्यातून राज्याचं वातावरण चांगलं राहील” असं शरद पवार म्हणाले.
‘त्याला मुख्यमंत्री अनुकूल असावेत’
“मुख्यमंत्री माझ्याशी बोलले. त्याला आठ दिवस झाले. इतरांशी चर्चा करावी हे मी त्यांनी सूचवलं. त्याला मुख्यमंत्री अनुकूल असावेत. ही प्रक्रिया सुरू झाली तर जरांगे आणि इतर जे अस्वस्थता आहे, त्यातून मार्ग निघू शकेल. आरक्षणाचा प्रश्न सुटावा हा आमचा प्रयत्न आहे. ज्या ज्या घटकांकडून मार्ग निघत असेल त्यांना सोबत घेऊन संवाद साधून मार्ग काढावा असं आमचं मत आहे” असं शरद पवार म्हणाले.