आरंभ है प्रचंड… शरद पवार यांची नाशिकमध्ये पहिली जाहीर सभा; निशाण्यावर कोण अजितदादा की भुजबळ?

| Updated on: Jul 08, 2023 | 9:50 AM

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आता राज्यव्यापी दौऱ्यावर निघाले आहेत. शरद पवार आज नाशिकच्या येवला येथे सभा घेणार आहेत.

आरंभ है प्रचंड... शरद पवार यांची नाशिकमध्ये पहिली जाहीर सभा; निशाण्यावर कोण अजितदादा की भुजबळ?
Sharad Pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादीत दोन गट झाले आहेत. इतकेच नव्हे तर अजित पवार यांनी केवळ बंडच केलं नसून त्यांनी पक्षाचं चिन्हं आणि पक्षावरही दावा केला आहे. अजित पवार यांनी आपणच पक्षाचे अध्यक्ष असल्याचा दावा निवडणूक आयोगाकडेही केला आहे. त्यामुळे शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि दिलीप वळसे पाटील यांच्यापर्यंतची सर्व विश्वासू नेते अजित पवार यांना जाऊन मिळाले आहे. पक्षात पडझड झाल्यानंतर आता पक्ष सावरण्यासाठी शरद पवार सज्ज झाले आहेत. गेल्या आठवड्यात पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार आज राज्यात पहिली जाहीर सभा घेणार आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकच्या येवला मतदारसंघात शरद पवार यांची आज पहिली जाहीर सभा होणार आहे. आज सायंकाळी 4 वाजता येवला येथे ही सभा होणार आहे. या सभेच्या माध्यमातून शरद पवार राज्यव्यापी दौऱ्याचा पहिला नारळ येवला येथे फोडणार आहेत. तसेच संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. वयाच्या 83व्या वर्षीही शरद पवार मैदानात उतरले आहेत. पक्षातील फुटीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार काय बोलणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा

असा आहे दौरा

शरद पवार सकाळी 8 वाजता मुंबईहून नाशिकच्या दिशेने निघाले. ठाण्यात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. ठाणे चेक नाका येथे जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं जोरदार स्वागत केलं. त्यानंतर हा ताफा नाशिकच्या दिशेने निघाला. मुंबईहून ठाणे मार्गे नाशिककडे शरद पवार जात आहेत. दुपारी 12 वाजता ते नासिकमध्ये पोहचतील. त्यानंतर येवल्याला जातील. येवल्यात ते राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. त्यानंतर ते सभेच्या ठिकाणी येतील असं सूत्रांनी सांगितलं.

दोन दौरे अनिश्चित

दरम्यान, शरद पवार यांचे पुढचे दोन दौरे अनिश्चित आहेत. धुळे आणि जळगाव दौरा पावसाचा अंदाज घेऊन लवकरच जाहीर होईल, असं राष्ट्रवादीच्या सूत्रांनी सांगितलं. आजची येवल्यातील सभा पार पडल्यानंतर पुढील दौऱ्याची घोषणा केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं.

निशाण्यावर कोण?

दरम्यान, आजच्या दौऱ्यात शरद पवार यांच्या निशाण्यावर कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शरद पवार आजच्या सभेतून अजित पवार यांच्यावर टीका करतात, छगन भुजबळ यांच्यावर टीका करतात की भाजपवर याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आजच्या सभेतून शरद पवार काही गौप्यस्फोट करतात का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.