नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी झालेल्या राड्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या सांगण्यावरूनच पवारांच्या घरावर एसटी कर्मचारी (ST Workers) धडकल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येतोय. त्यानुसार सदावर्ते यांना अटकही करण्यात आला. इतकंच नाही तर पवारांच्या घरावरील हल्ल्याचं नागपूर कनेक्शनही सांगितलं जात होतं. तेच नागपूर कनेक्शन आता अखेर उघड झालं आहे. नागपुरातील एका एसटी कर्मचाऱ्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलंय. संदीप गोडबोले असं या एसटी कर्मचाऱ्याचं नाव असून तो यांत्रिक पदावर कार्यरत आहे. पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याच्या वेळी गोडबोले हा सदावर्ते यांच्या संपर्कात होता, असा दावा केला जात आहे. गोडबोले याला चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
11 एप्रिलला झालेल्या सुनावणीवेळी गुणरत्न सदावर्तेंची कोठडी मागताना सरकारी वकील प्रदीप घरत यांनी काही महत्वाच्या बाबी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. गुणरत्न सदावर्ते तपासाला सहकार्य करत नाहीत, त्यामुळं 11 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्याचबरोबर पवारांच्या घरावरील हल्ल्यात आणखी चार आरोपींना ताब्यात घेतलंय, असंही घरत म्हणाले होते. MJT मराठी यू ट्यूब चॅनलच्या चंद्रकांत सूर्यवंशी या पत्रकाराशी सदावर्ते संपर्कात होते. हल्ल्याआधी एक बैठक झाली, नागपुरातूनही एक कॉल आला होता. नागपुरातून कुणाचा फोन आला होता, तपास करायचा आहे. फोनसंदर्भात आरोपी कोणतीही माहिती देत नाहीत, असा आरोप यावेळी करण्यात आला. तर 530 रुपये सदावर्तेंनी प्रत्येक कर्मचाऱ्याकडून घेतले आजपर्यंत सदावर्तेंनी दीड कोटी गोळा केले, असेही सांगण्यात आले होते.
8 एप्रिल रोजी झालेल्या राड्याबाबत वकील गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांना कोर्टात हजर केलं असता सुरुवातील दोन आणि नंतर दोन असे चार दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर आज सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याचबरोबर सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आलाय. इतकंच नाही तर सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना सहआरोपी करण्यात आल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय.
गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने एका वृत्तवाहिनीवर बोलताना त्यांनी बेताल वक्तव्य केले होते. तेढ निर्माण होईल असं वक्तव्य झाल्याने याप्रकरणी एका तक्रारदाराने शहर पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली. साधारण दीड वर्षापूर्वी दाखल असलेल्या या गुन्ह्यात त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. यामुळे सातारा पोलिसांनी सदावर्ते यांचा ताबा मागितला होता. त्यानुसार सदावर्ते यांचा ताबा आता सातारा पोलिसांकडे देण्यात आलाय.
इतर बातम्या :