देशात सध्या नीट परीक्षा घोटाळ्याचा मुद्दा गाजत आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित हा विषय आहे. घोटाळ्यामागच्या सूत्रधारांना शोधून काढण्यासाठी तपास यंत्रणाकडून वेगवान हालचाली सुरु आहेत. काही संशयित आरोपींना अटक झाली आहे. याच नीट परीक्षेच्या मुद्यावरुन शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आहेत. त्यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर हल्लाबोल केला आहे. “शिक्षणाची एवढी वाईट अवस्था मागच्या 70-75 वर्षाच्या इतिहासात कधीच झाली नव्हती. एमबीबीएस सारख्या परीक्षेत गुणवत्ता तपासणार नसाल, केवळ वशिल्यावर घेणार असाल, तर या देशाच भविष्य अंधारात आहे तसही अंधारातच आहे” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
“एका परीक्षेत संपूर्ण घर सहभागी होतं. बहिण, भाऊ, नातेवाईक, आई-वडील सगळेच इनव्हॉल असतात. आई मुलांसाठी सगळं काही करते, जरा तिचा विचार करा. आईच्या डोळ्यात किती अश्रू असतील, मुल डिप्रेशनमध्ये असतील. या नालायक सरकारला त्याचं काही देण-घेण नाही” अशा शब्दात जितेंद्र आव्हाडांनी टीका केली. “अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली. मुंबई-पुण्यातील नीटच्या विद्यार्थ्यांची भेट घेणार आहे, असं ते म्हणाले. भेट कसली घेता? तुम्ही त्या सरकारमध्ये सहभागी आहात. तुमच्या मित्र पक्षांचे मंत्री आहेत. केंद्रातील मंत्र्याचा राजीनामा मागा, नाहीतर तुम्ही राजीनामा द्या” अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली.
‘पोटाऐवजी छातीच ऑपरेशन करणार. मस्करी लावलीय का?’
“भेटता कसले, हिम्मत असेल तर राजीनामा द्या. वरच्या सरकारला वठणीवर आणा” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. “हेच MBBS चे विद्यार्थी पुढे जाऊन गायनॅक, न्यूरो सर्जन बनणार. तुमच शरीर त्यांच्या हातात देणार. ते काय काम करणार? 5-10 कोटी रुपये देऊन अशिक्षित माणूस डॉक्टर बनणार. तुमच्या पोटाऐवजी छातीच ऑपरेशन करणार. मस्करी लावलीय का? तुम्ही जनतेसोबत खेळत आहात. हे डॉक्टर पुढे जाऊन काय काम करणार?” असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनाी विचारला.
‘हा तुमच्या घरचा विषय आहे का?’
“विद्यार्थ्यांच वर्ष वाया गेलं. वर्षाच काही महत्व आहे की नाही. वय वाढतं. मेहनतीच काय करणार?. सरकारने प्रायश्चित घेतलं पाहिजे. सरकारने सत्य सांगितलं पाहिजे. मोठ्या महत्त्वाच्या परीक्षेची जबाबदारी प्रायव्हेट एजन्सीला कशी देता? हा तुमच्या घरचा विषय आहे का?” असे प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी विचारले आहेत.