बारामतीप्रमाणे माढा लोकसभेची जागा प्रतिष्ठेची बनली आहे. माढ्यात रणजितीसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर होताच धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाची तुतारी हाती घेतली. त्यामुळे माढ्यात आपला उमेदवार निवडून आणण्याच मोठं आव्हान भाजपासमोर निर्माण झालं. माढ्यामध्ये स्थानिक राजकीय गणित खूप महत्त्वाची ठरणार आहेत. त्यामुळे प्रत्येक छोट्या-मोठ्या नेत्याला आपल्याकडे खेचण्याचा पवार गट आणि भाजपाचा प्रयत्न आहे. उत्तमराव जानकर पवार गटाकडे झुकले आहेत. त्यामुळे भाजपाने आता शरद पवार गटाला अभिजीत पवार यांच्यारुपाने चीत करण्याची चाल खेळली आहे.
अभिजीत पाटील शरद पवार गटासोबत आहेत. पंढरपुरात त्यांचा राजकीय दबदबा आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत. विधानसभेला त्यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळेल असं बोलल जात होतं. ग्रामीण भागातील आश्वासक चेहरा म्हणून अभिजीत पाटील यांच्याकडे पाहिलं जातं. तेच अभिजीत पाटील आज देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहेत. मागच्या अर्ध्यातासापासून अभिजीत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा सुरु आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काल सोलापुरात तीन सभा झाल्या. माढ्यात मोहिते-पाटील कुटुंबाच राजकीय वजन आहे. तेच भाजपासून दूर गेल्याने इथून उमेदवार निवडून आणणं भाजपासाठी आव्हानात्मक बनलं आहे.
माढ्यातील राजकीय घडामोडींना वेग
अभिजीत पाटील आता भाजपाध्ये प्रवेश करतील अशी शक्यता आहे. असं झाल्यास शरद पवार गटासाठी मोठा धक्का असेल. कारण पश्चिम महाराष्ट्रातील एक तरुण, तडफदार नेतृत्व भाजपाकडे जाईल. अभिजीत पाटील ज्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत, त्यावर कारवाई झाली. त्यांची साखरेची गोडाऊन सील करण्यात आली. त्यानंतर माढ्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माढा लोकसभेतील समीकरण वेगाने बदलत आहेत.