नवी दिल्ली : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार दिल्लीत दाखल झालेत. आज होणाऱ्या संरक्षण समितीच्या बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार आहेत. शरद पवारांसोबतच राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेलही दिल्लीत दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे भाजप नेते दिल्ली दौऱ्यावर आहेत. भाजपच्या गोटात हालचाली वाढल्यानं आणि त्याचवेळी शरद पवारही दिल्लीत दाखल झाल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
संरक्षण समितीच्या बैैठकीला पवार उपस्थित राहणार
आज दिल्लीत संरक्षण समितीची महत्वची बैठक आयोजित करण्यात आली आहे. पवार संरक्षण खात्याच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्यानं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याबरोबर अन्य काही नेत्यांशी पवारांची चर्चा होणार आहे. या बैठकीला इतर पक्षांचे काही नेतेही उपस्थिती लावणार आहेत.
पवार आणखी काही भेटीगाठी घेणार?
शरद पवार संरक्षण खात्याच्या बैठकीसाठी दाखल झाले असले तरी पवार आणखी काही भेटीगाठी घेणार का हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. गेल्या काही तासामध्ये राज्यातल्या भाजप नेत्यांची दिल्लीतल्या नेत्यांसोबत खलबतं सुरू आहेत. त्यामुळे राज्यात भाजपमध्ये मोठ्या राजकीय बदलाचे वारे वाहण्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यात आगामी निवडणुकांसाठी भाजपनं कंबर कसल्याचंही दिसून येतंय. कालच चंद्रकांत पाटलांनी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर आज देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले आहेत. त्यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे पवारांची बैठक फडणवीसांचा दिल्ली दौरा हा केवळ योगायोग आहे का? हे पाहणंही मत्वाचं ठरणार आहे.