गजानन उमाटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर: आपण वर्ण आणि जातीव्यवस्था (caste system) सोडली पाहिजे. जातीव्यवस्थेमुळे समाजातील एका वर्गावर मोठा अन्याय झाला. ही आपल्या पूर्वजांची चूक होती. मधल्या काळात आपल्याकडून राष्ट्रीय पाप झालं आहे. त्यामुळे ब्राह्मणांनी पापक्षालन केलं पाहिजे, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी व्यक्त केलं होतं. त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही प्रतिक्रिया व्यक्त करताना केवळ माफी मागून चालणार नाही. तर व्यवहारातही ते दिसलं पाहिजे, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे नागपुरात आले होते. त्यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. समाधानाची बाब अशी आहे की, समाजातील एका मोठ्या वर्गाला काही पिढ्या यातना सहन करावा लागल्या. त्या यातनांशी संबंधित जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, त्या घटकांना याची जाण व्हायला लागली हा बदल योग्य आहे. पण माफी मागून चालणार नाही. तर व्यवहारात या वर्गाबाबतची भूमिका कशी घेत आहोत यावर सर्व गोष्टी अवलंबून आहे, असं शरद पवार म्हणाले.
मोहन भागवत यांच्या हस्ते काल नागपुरात एका पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं आहे. त्यावेळी भागवत बोलत होते. ब्राह्मण हा त्याच्या गुणामुळे आणि कर्मामुळे श्रेष्ठ होतो. उत्तम कर्म असणारा शुद्र सुद्धा पूज्य आहे आणि नीच कर्म असणारा ब्राह्मण सुद्धा हेय आहे.
दुर्देवाने मधल्या काळात आपल्याकडून राष्ट्रीय पाप झालं आहे. आपण शास्त्रांनी सुद्धा धर्म सोडला आणि लोक रुढीने सुद्धा धर्म सोडला. या पापाचं क्षालन केल्याशिवाय गत्यंतर नाही, असं मोहन भागवत म्हणाले.
यावेळी त्यांनी जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्थेचा त्याग करण्याचं आवाहन केलं. तो भुतकाळ होता. त्या भुतकाळात राहणं योग्य नाही, असंही ते म्हणाले. आपल्या पूर्वजांकडून चूक झाल्याचंही त्यांनी मान्य केलं. तर दुसरीकडे भारतात आंतरजातीय विवाह पूर्वीपासूनच होता, असंही त्यांनी सांगितलं.