Sharad Pawar : आरक्षणाच्या विषयात शरद पवार पुढाकार घेण्यास तयार, पण… त्यांच्या अटी काय?

| Updated on: Jul 17, 2024 | 1:49 PM

Sharad Pawar : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी दोन दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी तयार आहेत. पण त्यांनी सरकारसमोर काही अटी ठेवल्या आहेत.

Sharad Pawar : आरक्षणाच्या विषयात शरद पवार पुढाकार घेण्यास तयार, पण... त्यांच्या अटी काय?
शरद पवार
Image Credit source: tv9
Follow us on

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली. रविवारी आदल्याचदिवशी छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर बोचरी टीका केली होती. त्यानंतर सोमवारी छगन भुजबळ अचानक शरद पवार यांच्या सिलवर ओक निवासस्थानी पोहोचले. पवार त्यावेळी झोपले होते. त्यामुळे छगन भुजबळ यांना तासभर तिष्ठत थांबावं लागलं. छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यासोबत राज्यात गंभीर बनलेल्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा केली. मराठा समाज आणि ओबीसींमधील मतभेदांची दरी दूर करण्यासाठी पवारांना त्यांनी आवाहन केलं.

आज पुणे श्रमिक पत्रकार संघात वार्तालाप करताना शरद पवार यांनी या विषयावर भाष्य केलं. “भुजबळ म्हणाले, झालं गेलं सोडून द्या, मार्ग काढावा लागेल. नाहीतर महाराष्ट्रात वाद वाढतील. स्पष्ट सांगायचं म्हणजे या लोकांनी जी विधाने केली ती वाद वाढायला मदत करणारी होती. मार्ग काढायाचा असेल तर राज्यकर्त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. राज्यकर्त्यांनी कितपत ही भूमिका घेतली माहीत नाही. तसं दिसलं नाही” असं शरद पवार म्हणाले.

‘आम्हाला बाजूला ठेवून यांनी निर्णय घेतले’

“या सर्व गोष्टीत जे कोणी सरकारच्या वतीने चर्चेला गेले, त्यात मुख्यमंत्री होते, भुजबळ, फडणवीस, अजित पवार होते. इतर काही लोकं. या लोकांनी काय निर्णय घेतला बैठकीत, आम्हाला माहीत नव्हते. आम्हाला बाजूला ठेवून यांनी निर्णय घेतले. आता शांतता प्रस्थापित करण्यासाठी शरद पवार यांची गरज आहे, असं मार्गदर्शन भुजबळांनी केलं” असं शरद पवार म्हणाले.

‘बाकीच्या गोष्टी विसरून पुढे जाऊ’

“मी सांगितलं प्रश्न सोडवायचे असेल तर जरांगेंना काय कमिटमेंट दिल्या, कोणत्या गोष्टीची पूर्तता केली आणि काय करणार आहात, ते जरांगेंना सांगा. ओबीसीना त्यांच्या हिताची काही कमिटमेंट केली ती माहिती आम्हाला द्या. त्यातून काही चांगलं निघत असेल तर तुमची धोरणं दुरुस्त करून, बाकीच्या गोष्टी विसरून पुढे जाऊ. आज शांततेची गरज आहे” असं शरद पवार म्हणाले.