भारतीय जनता पार्टीच रविवारी शिर्डी येथे अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आले होते. त्यांनी यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन नेत्यांना टार्गेट केलं. त्यांच्यावर बोचरी टीका केली होती. आज महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अमित शाह यांच्या टीकेला उत्तर दिलं. शरद पवार यांनी इतिहासाची पान पलटताना जुन्या गोष्टी बाहेर काढल्या. त्यांनी अमित शाह यांच्यावर व्यक्तीगत स्वरुपाचा हल्ला केला. अमित शाहंचा तडीपारच्या वेळचा सर्व इतिहास बाहेर काढला.
“उद्धव ठाकरेंबाबत जी भूमिका घेतली ती लोकांनी पाहिली. उद्धव ठाकरे सुद्धा त्यावर कधी तरी त्यांचं मत सांगतील. मला हे माहीत आहे, जेव्हा हे गृहस्थ गुजरातमध्ये राहू शकत नव्हते, अन् त्याला मुंबईत आसरा देण्यात आला होता. तेव्हा बाळासाहेबांच्या घरी जाऊन सहकार्य करावं अशी विनंती त्यांनी केली होती. याची माहिती माझ्यापेक्षा उद्धव ठाकरे सांगतील” असं शरद पवार म्हणाले. “पण दुर्देवाने पातळी घसरली किती हे सांगायला ही पुरेशी विधानं आहेत. अशा व्यक्तीने जी विधाने केली त्याची नोंद पक्षात किती घेतली हे न सांगितलेलं बरं” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
अमित शाह काय म्हणालेले?
“1978 मध्ये शरद पवार यांनी बंडखोरी करुन विश्वासघात करण्याचे जे राजकारण केलं, त्यावेळी त्यांना महाराष्ट्रातील जनतेने धडा शिकवण्याचं काम केलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये आमच्यासोबत द्रोह केला. त्यांनी विचारधारा सोडली. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले. त्या उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्याचे काम तुम्ही केले” असं अमित शाह शिर्डीतील अधिवेशनात म्हणाले. “विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवली. 1978 ते 2024 पर्यंत महाराष्ट्र जेव्हा जेव्हा अस्थिर करण्याचा प्रयत्न केला. त्या, त्या वेळी स्थिर सरकार देण्याचं काम तुम्ही केले. हिंदुत्व आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या राजकारणास विरोध करणाऱ्यांना तुम्ही धडा शिकवला. विधानसभा निवडणुकीत खरी शिवसेना खऱ्या राष्ट्रवादीला तुम्ही विजय केले. घराणेशाही राजकारण करणाऱ्यांना नाकारले” अशा शब्दात अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.