लोणावळा (रणजीत जाधव) : “आदर्श सोसायटी घोटाळ्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा हात आहे, असा आरोप भाजपने केला. सातव्या दिवशी ते भाजपमध्ये गेले आणि पंधराव्या दिवशी ते भाजपचे खासदार झाले. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे भ्रष्टवादी पक्ष म्हणाले. राज्य सहकारी बँक आणि जलसंपदा विभागात घोटाळा केला. असा आरोप मोदींनी केल्यावर मी म्हणालो, हिंमत असेल, तर चौकशी करा. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ दे, मोदींनी चौकशी करावी. मात्र घडलं काय? ज्यांच्यावर आरोप केले आज ते भाजपमध्ये आहेत. त्यामुळं भाजप म्हणजे वॉशिंग मशीन झालेली आहे. आरोप करा आणि त्यांना पक्ष प्रवेश देऊन आरोप धुवून काढा” अशी टीका शरद पवार यांनी केली. “सत्तेचा गैरवापर भाजप करतंय. झारखंड, दिल्ली या राज्यात तेच घडतं. नोटीस, समन्स द्यायचे आणि तुरुंगात टाकायचे. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ही लवकरच अटक केली जाईल” असं शरद पवार म्हणाले.
“नरेंद्र मोदींचे भाषण पहा. काल ते बंगालमध्ये होते, तिथं ममता बॅनर्जीवर बोलले. ममता आणि मी एकत्र काम केलय. त्यांच्या घरी मी गेलेलो आहे. मुख्यमंत्री आणि केंद्रात मंत्री असणाऱ्या ममता यांचं घर अगदी छोटं आहे. अशा वाघिणीवर जनता कायम विश्वास ठेवत आलीये. पण त्या वाघिणीवर मोदी बोलतायेत. हे कायद्याच्या चौकटीत बसत नाही, मोदींना हे शोभत नाही” अशी टीका शरद पवार यांनी केली.
‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या हीच मोदींची गॅरंटी का?’
“पक्ष स्थापनेपासून आम्ही विचारधारा कधीच बदलली नाही. जवाहरलाल नेहरूंबद्दल काहीही बोललं जातंय. गांधी, सुभाषबाबू, जवाहरलाल नेहरू यांचं योगदान हे देश स्वतंत्र करण्यासाठी होतं. अशा लोकांची नोंद जाणकारांनी घ्यायचे असते. आज देशाचे पंतप्रधान प्रत्येक दिवशी पूर्ण पान जाहिरात देतायेत. त्यात मोदींची गॅरंटी देतायेत, पण ही कोणाच्या पैशाने जाहिराती दिली जातेय. जनतेच्या पैशाने हे गॅरंटी देतायेत” अशी टीका शरद पवार यांनी केली. “आज हे सांगतात, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वाढवतो. गेली दहा वर्षे मोदी सत्तेत आहेत, उत्पन्न वाढलं का? उलट शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आणली, हीच मोदींनी गॅरंटी दिली” अशी खोचक टीका शरद पवार यांनी केली.