“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक आश्वासन दिली, पण कृतीत आणली नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली जनतेसमोर अनेक गोष्टी मांडल्या. मनमोहन सिंग यांच्यावर टिका, टिप्पणी केली. पण आज तेच निर्णय राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकांना हा विरोधाभास दिसतोय. लोकांमध्ये त्यांच्याबद्दल नाराजी आहे” असं शरद पवार म्हणाले. “पंतप्रधान मोदी त्यांच्या आणि मनमोहन सिंग यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळाची तुलना करतात. पण मनमोहन सिंग यांचं वैशिष्ट्य होतं, ते कुठलाही गाजावाजा न करता, शांतपणे काम करुन रिझल्ट द्यायचे. मोदींच्या रिझल्टबद्दल माहिती नाही, पण त्यांचा चर्चा, भाष्य, टिका टिप्पणी यामध्ये फारवेळ जातो. लोकांच्या लक्षात येतय हे काही खरं नाही” असं शरद पवार म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही 9 नेटवर्कला महामुलाखत दिली. त्यात ते म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यामुळे फुटली नाही. नेतृत्व कोण करणार? यावरुन पवारांच्या घरातील भांडण आहे” ‘कुटुंब संभाळता आलं नाही, महाराष्ट्र काय संभाळणार?’ अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली. आज शरद पवारांनी या टीकेला उत्तर दिलं. “मोदींनी कुठे कुटुंब सांभाळलं? मी त्यावर जाऊ इच्छित नाही. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी चिंताजनक आहे. पण आपण व्यक्तीगत बोलणार नाही” असं शरद पवार म्हणाले.
‘त्यांनी लाख म्हटलं असेल, पण…’
या महामुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, उद्धव ठाकरेंच्या आजारपणाच्या काळात त्यांची विचारपूस करायचो असं सांगितलं. “उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत. संकटकाळात त्यांना मदत करणार पहिला माणसू मी असेन” असं पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यावर शरद पवार म्हणाले की, “त्यांनी लाख म्हटलं असेल, पण आमची प्रार्थना आहे की, उद्धव ठाकरेंना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये”
‘देशाचे पंतप्रधान कितीवेळा महाराष्ट्रात येतात?
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सातत्याने महाराष्ट्र दौरे सुरु आहेत, त्यावरही शरद पवारांनी भाष्य केलं. “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कितीवेळा महाराष्ट्रात येतात? यातून आत्मविश्वास नाही हेच दिसतं” असं शरद पवार म्हणाले.