मुंबई : माजी मंत्री आणि धडाडीचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलीय. त्यानंतर आज कदम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार टीका केलीय. शरद पवारांनी डाव साधला, संधी पाहून त्यांनी शिवसेना फोडली. अजित पवारांचा प्रशासकीय अनुभव प्रचंड आहे. त्याच्या जोरावर त्यांनीही शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कदम यांनी केलाय. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही कदमांना प्रत्युत्तर देण्यात आलंय. सत्तेसाठी सगळे शिवसेना सोडून जाताना शरद पवार उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी केलीय.
‘शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी शरद पवार व अजितदादा पवारांवर शिवसेना फोडीचे बेछूट आरोप केले. रामदास कदमांनी हे लक्षात घेतले पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप करण्यापेक्षा एकनाथ शिंदेच्या मागे जी महाशक्ती उभी आहे त्या महाशक्तीने एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून शिवसेना पक्ष फोडला आहे, त्याच महाशक्ती पुढे तुम्ही लोटांगण घालणार आहात. आज तुमच्यासारखे जुने शिवसैनिक ज्यांना बाळासाहेबांनी मोठं केलं मंत्रीपदे दिली. परंतु शिवसेना सोडण्यासाठी तुमच्याकडे काही कारण नसल्याने असे बेछूट आरोप पवारसाहेब व अजितदादांवर करत आहात. परंतु सत्तेसाठी सगळे शिवसेना सोडून जाताना शरद पवार उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत’, असं रविकांत वरपे यांनी म्हटलंय.
शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर रामदास कदम यांनी पवारांवर टीका केली. शरद पवारांनी डाव साधला, पक्ष फोडला. मी खूप अस्वस्थ आहे. मी राजीनामा दिल्यानं मी समाधानी नाही, आनंदी नाही. 52 वर्षे लढणारा नेता राजीनामा का देतो? याचा विचार करायला हवा. दु:ख होतं, वेदना होतात. मी प्रामाणिकपणे हात जोडून आपण राष्ट्रवादीसोबत बसू नका, असं सांगितलं होतं. बाळासाहेबांनी हिंदुत्व वाढवलं. ही बाळासाहेबांची शिवसेना नाही. शरद पवारांनी डाव साधला, उद्धव ठाकरे भोळे आहेत. त्यांना पवारांचा डाव कळला नाही. शरद पवारांनी पक्ष फोडला, असंही कदम म्हणाले.