नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पक्ष सोडताना शरद पवार (Sharad pawar in Nashik) हे आमचं दैवत आहेत, असं म्हणतात आणि पक्ष सोडतात. या नेत्यांना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी (Sharad pawar in Nashik) चांगलाच टोला लगावलाय. सोडून जाणाऱ्यांच्या अंतःकरणात मी आहे असं ऐकतोय, असं म्हणत त्यांनी दबावाचं राजकारण सुरु असल्याचाही आरोप केला. आमच्या काही नेत्यांच्या संस्थांची चौकशी सुरु आहे. सरकारी यंत्रणाचा आयुध म्हणून वापर केला जातोय, असा टोला शरद पवारांनी लगावला.
नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी विविध विषयांवर भाष्य केलं. भाजपमध्ये मेगाभरती सुरु आहे, पण लोक शहाणे आहेत, तेच निकाल लावतील, असंही शरद पवार म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्राच्या अधोगतीचे पुरावे लवकरच देऊ, असा इशाराही शरद पवारांनी दिला.
शरद पवार नाशिकमध्ये असताना पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे उपस्थित नसल्याचे पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरु झाल्या. पण मुंबईत राष्ट्रवादीची बैठक असून त्या बैठकीसाठी भुजबळ मुंबईतच थांबले, असं स्पष्टीकरण पवारांनी दिलं.
काँग्रेस-राष्ट्रवादीचं जागावाटप ठरलं
येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाराष्ट्रातील 288 जागांपैकी प्रत्येकी 125-125 जागा लढवणार आहेत. तर मित्रपक्षांसाठी 38 जागा सोडण्यात आल्या आहेत, असं शरद पवार यांनी सांगितलं.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या जागावाटपाचं सूत्र ठरलेलं असलं, तरी कोणत्या जागा कोण लढवणार, अनेक आमदारांनी पक्षांतर केल्यामुळे कोणते उमेदवार मैदानात उतरणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे. तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी, शेकाप आणि डावे पक्ष असलेल्या आघाडीमध्ये मित्रपक्षांपैकी कोणाला किती जागा मिळणार (Congress NCP Alliance Fixed), हे उत्सुकतेचं आहे.