महाबळेश्वर : सातारा जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. जावळी सोसायटी गटातून शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. तर ज्ञानदेव रांजणे यांनी बाजी मारली आहे. शशिकांत शिंदे यांना 24 तर रांजणे यांना 25 मतं मिळाली. शिंदे यांच्या पराभवानंतर समर्थक चांगलेच भडकले होते. त्यांनी राष्ट्रवादीच्याच कार्यालयावर दगडफेक केल्याची घटना काल घडली होती. त्यानंतर शिंदे यांनी समर्थकांच्या कृत्यावरुन दिलगिरीही व्यक्त केली होती. दरम्यान, शिंदे यांच्या या पराभवावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलंय. (Sharad Pawar’s opinion that Shashikant Shinde did not take Satara District Bank election seriously)
शशिकांत शिंदे यांच्या पराभवाबाबत पत्रकारांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला असता, मी काही त्याच्या खोलात गेलो नाही. पण मला असं वाटतं की शिंदेंनी ही निवडणूक अधिक गांभीर्यानं घ्यायला हवी होती, असं शरद पवार म्हणाले. दरम्यान, शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयावर केलेल्या दगडफेकीनंतर शरद पवार यांनी काल संध्याकाळी जिल्ह्यातील नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला शशिकांत शिंदेही उपस्थित होते. या बैठकीत शिंदे यांच्या पराभवाबाबत शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळाली होती.
दुसरीकडे गृहराज्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते शंभुराज देसाई यांनाही या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. त्याबाबत विचारलं असता, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून लढलोच नव्हतो. बँकेचा विषय काढला तर आम्ही पक्ष म्हणून निवडणूक लढवली नव्हती. सहकार पॅनल म्हणून निवडणूक लढवली होती. त्यात सगळं दिसत होतं की कोण कुणाला मदत करतंय. साधारणत: महाराष्ट्रात सहकाराच्या निवडणुकीत पक्ष हा विषय आम्ही घेत नाही. आता जवळगावमध्ये 21 पैकी 20 जागा आल्या. निवडून आलेल्या लोकांची यादी पाहिली. त्यात राष्ट्रवादीचे लोक जास्त आलेत. नंतर शिवसेना आणि काँग्रेसही त्यात आहे. या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर, पक्षाच्या नावानं, पक्षाचा उमेदवार अशी नव्हती.
दरम्यान, जिल्हा बँक निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर शशिकांत शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. ज्यांना मी वाढवलं त्यांनी मला आव्हान देण्याचा प्रयत्न करु नये. मी आजपर्यंत पक्षाच्या चौकटीत बंधनात होतो. मी आता मोकळा झालो आहे. यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस जावळी तालुक्यात साताऱ्यात वाढवण्यासाठी 100 टक्के प्रयत्न करेन. त्यांनी त्यांची ताकद लावावी, मी माझी ताकद लावतो, असा इशारा शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.
इतर बातम्या :
मुंबई विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अपक्षाची उडी, शिवसेनेला दगाफटका होणार?
Sharad Pawar’s opinion that Shashikant Shinde did not take Satara District Bank election seriously