बुलढाणा (गणेश सोळंकी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडणूक आयोगात सुनावणी सुरु आहे. अजित पवार आणि शरद पवार दोन्ही गटांनी पक्षावर आपला दावा सांगितला आहे. या सुनावणी संदर्भात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी वक्तव्य केलं आहे. “सुनावण्या दोन्ही पक्षांच्या चालू आहेत. मेरीटवर आमच्याकडून निकाल लागेल. आमचा निकाल तोच राष्ट्रवादीचा निकाल. जी संख्या त्यांच्याकडे आहे, तेवढीच आमच्याकडे आहे” असं संजय गायकवाड म्हणाले. शिंदे गटातील आणि अजित दादा गटातील आमदार भाजप मध्ये प्रवेश करतील या संजय राऊत यांच्या दाव्यावर गायकवाड म्हणाले की, “संजय राऊत यांचे आतापर्यंत चे सगळे दावे फेल ठरले. ते जे भविष्यवाणी करतात ,ती कधी खरी ठरली नाही. आता आमचे जाण्यापेक्षा तुमचे किती राहतील?. 31 डिसेंबर पर्यंत आमचे तर कुणी जाणार नाही. पण तुमच्याकडचे आमच्याकडे किती येतील, हे संजय राउत यांनी पाहावं”
आदित्य ठाकरे यांनी 16 चे 160 आमदार होतील, असा दावा केला आहे. त्यावरही संजय गायकवाड यांनी मत नोंदवलं. “16 चे 6 राहतात का, याची काळजी करा. 160 तर कोणाचेच होऊ शकले नाहीत. काँग्रेसचे सुद्धा होऊ शकले नाही. आदित्यने स्वप्न पाहण बंद करावं. 2024 पर्यंत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार. 2024 ची निवडणूक आम्ही तिघेही एकत्र लढणार आणि दोनशे पर्यंत पोहचणार” असा दावा संजय गायकवाड यांनी केला.
‘हा साधा प्रोटोकॉल संजय राऊतला माहिती नाही’
राहुल नार्वेकर दिल्लीच्या आदेशावर काम करतात असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यावर संजय गायकवाड म्हणाले की, “पक्षासोबत काम करताना वरिष्ठांशी चर्चा करणे, हा पक्षाचा नियम आहे. हा साधा प्रोटोकॉल संजय राऊतला माहिती नाही. काही निर्णय घेताना त्यांनी बाळासाहेबांना विचारले नाही का?. निर्णय घेताना शरद पवारांकडे जात नव्हते का? असा सवाल संजय गायकवाड यांनी विचारला.