एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळच्या नेत्याच्या उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा; मुख्यमंत्रीपदाबाबत काय म्हणाले?

| Updated on: Jul 27, 2024 | 12:16 PM

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. आज सकाळपासूनच त्यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मातोश्री येथे राज्यभरातील शिवसैनिक आणि पदाधिकारी येऊन त्यांना शुभेच्छा देत आहेत. सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून उद्धव ठाकरे यांचं अभिष्टचिंतन केलं जात आहे. शिंदे गटाच्या एका नेत्यानेही उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्याने सर्वांच्या भुवया उंचवल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळच्या नेत्याच्या उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा; मुख्यमंत्रीपदाबाबत काय म्हणाले?
Uddhav Thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्यावर चोहोबाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर शिवसैनिकांची रांग लागली आहे. गुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. शिंदे गटाचे अत्यंत महत्त्वाचे नेते, माजी मंत्री, माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुषाची कामनाही केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर सतत तोंडसुख घेणाऱ्या नेत्यानेच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

रामदास कदम यांचाही आज वाढदिवस आहे. उद्धव ठाकरे यांचाही वाढदिवस आहे. त्यामुळे रामदास कदम यांनी मीडियाशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उद्धवजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांना आणखी आयुष्य लाभो, अशा शुभेच्छा देतानाच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून घरीच बसून राहिले होते. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद मिळू नये. असा मुख्यमंत्री होऊ नये. नाही तर महाराष्ट्र विकासात आणखी मागे जाईल, असा चिमटा रामदास कदम यांनी काढला.

पुन्हा मुख्यमंत्री होऊच नये

उद्धव ठाकरे यांना परमेश्वराने मुख्यमंत्रीपदाची संधी दिली होती. काम करण्याची संधी होती. या संधीचं सोनं करता आलं असतं. पण त्यांना कोणताही निर्णय घेता आला नाही. मंत्रालयात जात नव्हते. त्यामुळे ते पुन्हा मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्राचे नुकसानच होईल. मी त्यांना आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. तसेच ते पुन्हा मुख्यमंत्री होऊच नये, महाराष्ट्राचे नुकसान होऊ नये याच्या देखील शुभेच्छा देतो, असं रामदास कदम म्हणाले.

एकत्र निर्णय घेणार

वाढदिवसाच्या दिवशी राजकारण करणं योग्य नाही. आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहोत. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीची महायुती प्रत्येक निर्णय एकत्र बसून घेील, असंही रामदास कदम यांनी स्पष्ट केलं.

राऊतांना गांभीर्याने घेत नाही

यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ते आरोप करतात. आजच्या दिवशी कुणाला वाईट न बोलणं अधिक चांगलं होईल, असं मला वाटतं. पण संजय राऊतला आता कोणी गांभीर्याने घेत नाही. ते वारंवार वायफळ बोलत असतात, अशी टीका त्यांनी केली.

केंद्र सरकार निधी देईल

यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवरही भाष्य केलं. केंद्र सरकार आमच्या सोबत आहे. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहेत. ज्या ज्या वेळी महाराष्ट्राला गरज लागेल त्या त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सह्याद्री सारखे एकनाथ शिंदे यांच्या पाठी उभे राहतील. जो काही निधी लागेल तो केंद्र सरकार देईल. संजय राऊत यांनी चिंता करू नये, असंही ते म्हणाले.