मुंबई : धनुषबाण चिन्ह आणि शिवसेना ( Shiv Sena ) हे नाव एकनाथ शिंदे गटाला (Eknath Shinde ) मिळाल्यानंतर महाराष्ट्रभरात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने एकच जल्लोष केला. कारण आता त्यांना पक्षाचं मुळ नाव मिळालं. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या घराशेजारी शिंदे गटाचा जल्लोष केला. ढोल-ताशा, नगाडे मागवून चिन्ह आणि नाव भेटल्याबाबत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी शेकडो संख्येनं कार्यकर्त्ये रस्त्यावर ऊतरले होते. शिवसेनेचा झेंडा हातात घेत आणि घोषणा देत महिला देखील या जल्लोषात सहभागी झाल्या होत्या.
निवडणूक आयोगाने आज महत्त्वाचा निर्णय दिला. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवं वळण लागणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट असा संघर्ष सुरु आहे. सुप्रीम कोर्टात अजून यावर सुनावणी सुरु आहे. पण या दरम्यानच निवडणूक आयोगाचा निर्णय आल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
आमदार आणि खासदारांच्या संख्येच्या जोरावर हा निर्णय आल्याचं शिंदे गटाच्या नेत्यांचं म्हणणं आहे. तर निवडणूक आयोगाने दबावामध्ये हा निर्णय घेतल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे.
शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणाला मिळणार याबाबत देशभरातील लोकांचं लक्ष लागून होतं. कारण शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं होतं. शिवसेनेत पहिल्यांदाच इतकी मोठी फूट पडली होती. ज्यामुळे देशभरातील लोकांचं लक्ष याकडे वेधलं गेलं होतं.