मुंबईः महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi)धक्का देऊ पाहणाऱ्या एकनाथ शिंदे गटालाच मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदारांना सोबत घेऊन निघालेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला कायद्यानंच उत्तर देण्याचं शिवसेनेनं ठरवलं आहे. आज शिवसेनेनं सुप्रीम कोर्टाचे वकील देवदत्त कामत (Add. Devdatta Kamat) यांच्याशी या संपूर्ण बंडाबाबत सविस्तर बातचित केली. यावेळी देवदत्त कामत यांनी शिंदे गटाने केलेल्या मागण्या आणि दावे खोडून काढले. यासाठी कायदेशीर आधार असल्याचंही त्यांनी सांगितलं. राजकीय बाबींवर मी बोलणार नसून सदर घटेतील कायदेशीर बाजूंवरच मी प्रकाश टाकतोय, अस कामत यांनी सुरुवातीलाच स्पषअट केलं. सध्या शिंदे गट आणि पक्ष म्हणून उद्धव ठाकरे अशा दोन्ही बाजूंनी काही कारवाई आणि मागण्या केल्या जात आहेत, त्याबाबत अनेक भ्रम निर्माण होत असून ते दूर करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. या सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मोठ्या संख्येनं आमदार घेऊन बाहेर पडेलेल्या एकनाथ शिंदे गटाला दुसऱ्या नावाने गट निर्माण करता येमार नाही. त्यांना भाजप किंवा दुसऱ्या पक्षात जाणे एवढाच पर्याय समोर आहे, असं कामत यांनी स्पष्ट केलं.
आपल्याकडे दोन तृतीयांश सदस्यांचा पाठिंबा असल्याचं वारंवार एकनाथ शिंदे गटाकडून सांगण्यात येतंय. त्याआधारे ते शिवसेनेतच दुसऱ्या गटाची स्थापना करू शकतात, असा दावा केला जात होता. मात्र अॅड. देवदत्त कामत यांनी कायद्याचा आधार देत ही शक्यता सपशेल नाकारली. ते म्हणाले, ‘ दोन तृतियांशचा स्वतंत्र गट स्थापन करण्याचा दावा चुकीचा आहे. ते फक्त विलिनीकरणातच शक्य आहे. आत्तापर्यंत त्यांचे विलिनीकरण झालेले नाही. २००३ मध्ये दोन तृतियांशचा अधिकार रद्द केला आहे. त्यांच्याविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे यात पक्षात दुसरा गट स्थापन करता येणार नाही…’
शिवसेनेनं बंडखोर आमदारांविरोधात अपात्रतेच्या कारवाईला सुरुवात केली आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांना एक तर भाजपा किंवा दुसऱ्या एखाद्या पक्षात विलीन व्हावे लागणार आहे. आता बंडखोर आमदार काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.