स्पेशल रिपोर्ट : हेमंत गोडसेंना तिकीट पण महाराज खेळ बिघडवणार?

| Updated on: May 01, 2024 | 10:45 PM

नाशिकमध्ये अखेर शिंदेंच्या शिवसेनेकडून हेमंत गोडसेंना तिकीट जाहीर झालंय. पण आता शिंदे गटाकडून इच्छूक असलेल्या शांतीगिरी महाराजांनी दंड थोपटलेत. लढणार आणि जिंकणार म्हणत शांतीगिरी महाराजांनी आव्हान उभं केलंय.

स्पेशल रिपोर्ट : हेमंत गोडसेंना तिकीट पण महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना तिकीट पण महाराज खेळ बिघडवणार?
Follow us on

अखेर नाशिकमधून शिंदेंच्या शिवसेनेकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर झाली. शिंदे गटानं त्यांच्या कोट्यातील 3 जागांवर उमेदवार जाहीर केलेत. कल्याणमधून श्रीकांत शिंदे, ठाण्यातून नरेश म्हस्केंना उमेदवारी जाहीर झालीय. तर नाशिकमधून हेमंत गोडसेंना तिकीट देण्यात आलंय. नाशिकमध्ये महिन्याभरापासून जोरदार रस्सीखेच सुरु होती. अखेर ही जागा शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला येण्यासह गोडसेंच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडली. नाशिकमध्ये हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर झाली आणि इकडे भाजपमध्ये नाराजीनाट्य सुरु झालं. भाजपकडून इच्छूक दिनकर पाटलांनी गोडेसेंना तिकीट देवून चूक झाल्याची टीका केली. मात्र आपण बंडखोरी करणार नाही, हे स्पष्ट करतानाच दिनकर पाटलांनी वरिष्ठ नेत्यांना भेटून पुढची भूमिका जाहीर करणार असल्याचं सांगितलं आहे. नाशिकमध्ये शिंदे गटाकडून इच्छुक असेलेले शांतीगिरी महाराज आणि अनिकेश शास्त्रींनीही अपक्ष अर्ज दाखल केलेत. मात्र लढणार आणि जिंकणार म्हणत, शांतीगिरी महाराज लढण्यावर ठाम आहेत.

शिंदे गटाच्या उमेदवारीनंतर 3 ठिकाणी लढती निश्चित झाल्यात. नाशिकमधून शिंदे गटाचे हेमंत गोडसे विरुद्ध ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजेंमध्ये लढत होईल. कल्याणमधून शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे आणि ठाकरे गटाच्या वैशाली दरेकरांमध्ये सामना आहे. ठाण्यातून शिंदे गटाच्या नरेश म्हस्केंचा सामना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारेंशी होईल. शिंदे गटानं नाशिकसह कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश म्हस्केंना संधी दिलीय.

श्रीकांत शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

उमेदवारी घोषित झाल्यानंतर श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्केंनी, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी भाजपचे मुंबई उत्तर पूर्वचे उमेदवार मिहीर कोटेचाही उपस्थित होते. राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठींबा जाहीर केलाय आणि आता स्वत: राज ठाकरे महायुतीच्या उमेदवारांसाठी सभाही घेणार आहेत. पालघरची जागा भाजपच्याच वाट्याला गेली असून, शिंदेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित भाजपकडून लढण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झालंय. 2019मध्ये भाजपनं शिवसेनेला ही जागा उमेदवारासह दिली होती. त्यामुळं महायुतीचा जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युलाही समोर आलाय.

महायुतीत कुणाला किती जागा?

भाजपला सर्वाधिक 28 जागा मिळाल्यात. शिंदेंची शिवसेना 15 जागा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला 4 जागा आल्यात. तर रासपला परभणीची एक जागा मिळालीय. जागा वाटपात अर्थात, मोठ्या भावाच्या भूमिकेत भाजपच आहे. 2019च्या तुलनेत 3 जागा भाजप अधिक लढतेय. तर सुरुवातीला 22 जागांची मागणी करणाऱ्या शिंदे गटाला, 15 जागांवर समाधान मानावं लागलंय.